Thursday, October 17, 2024
Homeनगरविधानसभा निवडणुकीत आवश्यक परवानग्यांसाठी सुविधा कक्ष

विधानसभा निवडणुकीत आवश्यक परवानग्यांसाठी सुविधा कक्ष

परवानग्या घेऊनच सभा व बैठका घेण्याचे आवाहन || भित्तीपत्रकावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव आवश्यक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये विविध राजकीय पक्षांकडून सभा तसेच बैठकांचे आयोजन करण्यात येते. या सर्व सभा व बैठकांसाठी परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात. राजकीय पक्षांना आवश्यक असणार्‍या विविध परवानग्या विहित वेळेत मिळाव्यात यासाठी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिली आहे.

- Advertisement -

प्रचार फेरी, जाहीर सभा, चौक सभा यासह सर्व प्रकारच्या सभा, तहसील अंतर्गत सभा व रॅलीची परवानगी संबंधित पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्राप्त होणार आहे. सभेच्या ठिकाणी पोस्टर्स, झेंडे, कापडी बॅनर्स लावण्यासाठी महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्याकडून परवानगी देण्यात येणार आहे. खासगी जागेतील जाहिरात फलकावर प्रचार साहित्य लावण्याची परवानगी महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात (पांढरा रंग) प्रचार वाहनाची परवानगी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात येणार आहे.

उमेदवाराच्या तात्पुरत्या प्रचार कार्यालयाची परवानगी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात येणार आहे. हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठीची परवानगी अपर जिल्हादंडाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडून देण्यात येणार आहे. सभेसाठी ध्वनिक्षेपकाची परवानगी पोलीस विभाग, तर वाहनासाठी प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी परवानगी दिल्यावर पोलीस निरीक्षक परवानगी देणार आहे. शाळेच्या मैदानावर सभा घेण्यासाठीची परवानगी उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. तसेच सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडियावर प्रसिध्द करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएससाठी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती यांच्याकडे अर्ज करावा, असे जिल्हा निवडणूक शाखेने कळविले आहे.

राजकीय पक्षांनी निवडणूक नियमांचे पालन करावे

प्रशासनास सहकार्य करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

सालीमठ म्हणाले, निवडणुकीच्या कालावधीमध्ये विविध राजकीय पक्षांकडून सभा तसेच बैठकांचे आयोजन करण्यात येते. या सर्व सभा व बैठकांसाठी परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात. मतदारांना कुठल्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. विविध जाती, धर्म, भाषिक संप्रदायांमध्ये तेढ निर्माण होईल, असे कुठलेही वक्तव्य करू नये. कुठल्याही धार्मिक स्थळाचा प्रचारासाठी वापर करू नये.

समाजमाध्यमांवर पोस्ट टाकतेवेळी आवश्यक ती काळजी घ्यावी. सुचनांचे पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले. अधीक्षक ओला म्हणाले, निवडणुकीच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ही निवडणूक शांततेमध्ये पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भित्तीपत्रकावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव आवश्यक
लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम 127 – क नुसार कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव आणि पत्ता नमूद करणे बंधनकारक आहे, अन्यथा कोणतेही पत्रक अथवा भित्तीपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही. निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणार्‍या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अहिल्यानगर तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे पाठवावी, अन्यथा संबंधित मुद्रणालयाचा परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या