अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगातर्फे नियुक्त निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, जिल्ह्यातील 2 हजार 32 मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी प्रशासनाची ‘वेबकास्टिंग’च्या माध्यमातून नजर राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस निवडणूक निरीक्षक (सामान्य) ताई. के, अरूणकुमार, डी. रथ्ना, रंजिता, निवडणूक पोलीस निरीक्षक नागेन्द्रनाथ त्रिपाठी, खर्च निरीक्षक अरूण चौधरी, ग्यानचंद जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. केंद्रांवरील मतदानाची सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांना कॅमेर्यांच्या माध्यमातून थेट पाहता येणार आहे. त्यादृष्टीने 2 हजार 32 मतदान केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात निवडणुकीची सर्व तयारी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात येत असून मनुष्यबळ, ईव्हीएम, मतदान केंद्र आदी बाबत केलेल्या नियोजनाची माहिती दिली. सी व्हिजील आणि 1950 क्रमांकावर येणार्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, मतदानसाठी 464 एस.टी. बस, 1 हजार 115 जीप, 125 मिनी बस, 107 क्रुझर, 41 कार्गो अशा एकुण 1852 वाहनांचा उपयोग करण्यात येणार असल्याचे सालीमठ यांनी सांगितले.
4 कोटी 30 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त
आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे भंग केल्याप्रकरणी 8 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आतापर्यंत अवैध मद्य, रक्कम आदी मिळून 4 कोटी 30 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.