अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला विधानसभा निवडणुकीचा धुराळा सोमवारी सांयकाळी शांत झाला. विशेष करून 22 ऑक्टोबरला निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षातील घडामोडींसह निवडणूक यंत्रणेच्या हालचाली वाढल्या होत्या. दरम्यान, जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत राष्ट्रीय, राज्य पातळीवरील आणि जिल्हास्तरीवरील नेत्यांच्या प्रचारसभांमधील आरोप- प्रत्यारोपांनी मतदारांची चांगलीच करमणूक झाली.
दरम्यान, जाहीर प्रचार संपल्यानंतर आता छुपा प्रचार सुरू होणार असून जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागांसाठी 151 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात अकोले, राहुरी, श्रीरामपूर, श्रीगोंदा, पारनेर, नेवासा, शेवगाव-पाथर्डीत या मतदारसंघांत तिरंगी अथवा चौरंगी लढती होणार आहेत. याठिकाणी कोण कोणाच्या विजयाला आणि पराभवाला कारणीभूत ठरणार हे शनिवारी निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत 37 लाख 83 हजार 987 मतदार असून यात 19 लाख 46 हजार 944 पुरुष तर 18 लाख 36 हजार 841 महिला आणि 202 अन्य मतदार आहेत. यापैकी किती मतदार मतदानाचा हक्क बजावणार यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक विभाग, स्वीप समितीच्यावतीने वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदारांमध्ये अकोले 2 लाख 67 हजार 510, संगमनेर 2 लाख89 हजार 174, शिर्डी 2 लाख 92 हजार 911, कोपरगाव 2लाख 89 हजार 656, श्रीरामपूर 3 लाख 9 हजार 151, नेवासे 2 लाख 83 हजार 111, शेवगाव 3 लाख 74 हजार 442, राहुरी 3 लाख 24 हजार 59, पारनेर 3 लाख 50 हजार 350, अहमदनगर शहर 3 लाख 16 हजार 794, श्रीगोंदे 3 लाख 39 हजार 526, कर्जत-जामखेड 3 लाख 47 हजार 303 असे आहेत.
एसटीच्या 464 बसेससह खासगी वाहने तैनात
उद्या होणार्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी आज सकाळी साहित्याचे वाटप होणार आहे. या साहित्याच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या बससह खाजगी वाहने तैनात करण्यात आली आहेत. यात 3 हजार 765 मतदान केंद्रावर हे साहित्य पोहच करण्यासाठी वेगवेगळ्या 559 मार्गावर एसटी महामंडळाच्या 464 बसेससह 1 हजार 115 जीप, 125 मिनी बस, 107 क्रुझर, 41 वाहतूक कार्गो आणि 18 आयशर वाहनांचा समावेश आहे.
17 हजार 169 जणांनी घेतला टपाली मतदानाचा लाभ
विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील बारा मतदारसंघातील 17,169 मतदारांनी टपाली मतदानाचा लाभ घेतला यात 2173 जेष्ठ नागरिकांचा समावेश असून 340 दिव्यांग मतदार आहेत यासह निवडणूक कर्तव्य बजावणारे अधिकारी कर्मचारी अशा 14,278 तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी छप्पन आणि 322 सैनिक मतदार यांनी टपली मतदानाचा लाभ घेतला आहे जिल्ह्यात अकोले 1710 संगमनेर 2023 शिर्डी 840 कोपरगाव 928 श्रीरामपूर 1053 नेवासा 1783, शेवगाव 1537 राहुरी 1907पारनेर 349 नगर शहर 1349 श्रीगोंदा 1 हजार 159 कर्जत जामखेड 1 हजार 581 अशा 17 हजार 169 टपाली मतदानाचा लाभ घेणारे मतदार आहेत.
प्रचारात शेती आणि शेतकरी दुर्लक्षीत
विधानसभा निवडणूक 2024 ची प्रचाराची रणधुमाळी संपली. जिल्ह्यात यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारात निवडणुकीतील सर्वच राजकीय पक्षांनी मतदारसंघातील शेती, पाटपाणी, सोयाबीन, कपाशीचा हमीभाव, उसाचा दर या मुद्द्यावर न बोलता अन्य आरोप प्रत्यारोप शेती आणि शेतकर्यांच्या प्रश्नांपासून निवडणूक लांब नेली. अहिल्यानगर जिल्ह्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था, खंडित वीजपुरवठा, पाणी व साखर कारखान्याकडून उसाला मिळत असलेल्या कमी भावामुळे शेतकरी, सामान्य नागरिक त्रस्त आहे. याशिवाय बेरोजगारांचा प्रश्न, अतिक्रमणाचा प्रश्न, गुंडगिरी अशा कितीतरी समस्यांनी जनता आणि शेतकरी त्रस्त आहेत. सोशल मीडियावरही आपल्या नेत्याची विकासात्मक बाजू मांडण्याऐवजी विरोधकांवर जहरी शब्दांत व्यक्तिगत टीका करून ते व्हायरल करण्याचे प्रकार सुरू होते. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच मतदारसंघांत पक्ष-अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यांच्या प्रचारार्थ कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते आदींची फौजच मैदानात उतरलेली दिसली. सकाळ-सायंकाळ ही फौज मतदारांच्या घरी पोहोचत आहे. दरम्यान, जिल्ह्यात यंदाही ऊसदराचा प्रश्न कायम असून मागील दोन वर्षात अनेक शेतकर्यांना पीक विमा मिळाला नाही. ग्रामीण भागात रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठीच्या जलजीवन योजना अपूर्णच आहेत. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात रस्त्यांचे प्रश्न आहेत. हे सोडविण्यासाठी काय करणार यावर अपवादात्मक सर्वांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. एकंदरित यंदाची निवडणूक ही व्यक्तीगत पातळीवर आणि धर्माच्या पातळीवर वळवण्यात राजकीय पक्ष यशस्वी होताना दिसले.
श्रीगोंदा, श्रीरामपूरमध्ये नोटासाठी स्वतंत्र यंत्र
निवडणूक रिंगणात प्रत्येकी 16 उमेदवार असल्याने केवळ नोटा (यापैकी कोणीही नाही) या मतदान पर्यायासाठी स्वतंत्र मतदान यंत्र श्रीगोंदे व श्रीरामपूर मतदारसंघात असणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात संवेदनशील मतदान केंद्र एकही नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत 85 ते 90 टक्के व त्यापेक्षा जास्त मतदान झालेली दोन केंद्रे शिर्डी व संगमनेर मतदारसंघात प्रत्येकी एक आहे. जिल्ह्यात 3 हजार 763 मतदान केंद्र आहेत. मात्र पंधराशे पेक्षा जास्त मतदार संख्या असल्याने नगर तालुक्यातील बुर्हाणनगर (राहुरी मतदारसंघ) व राहाता तालुक्यातील लोणी (शिर्डी मतदारसंघ) येथे प्रत्येकी एक वाढीव मतदान केंद्र असणार आहेत.