अहिल्यानगर | सचिन दसपुते| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जिल्ह्याभरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीही काही जणांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला. तो पोलिसांनी हाणून पाडला व संबंधीत व्यक्तींविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. जिल्ह्याभरात 55 गुन्हे दाखल झाले त्यामध्ये 10 अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे.विधानसभा निवडणुकीची 15 ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू झाली. भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. दिवस रात्र पोलिसांकडून गस्त सुरू होती. तरीही काही नागरिकांनी कायदा हातात घेऊन निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. निवडणूक सुरू होताच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील सभेत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा प्रकार घडला. यामुळे वाद उफाळून आला. त्यातून तोडफोड आणि जाळपोळीची घटना घडली. यावरून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. जाहीर प्रचार संपल्यानंतर मतदारांना पैसे वाटप करताना कर्जत व जामखेड तालुक्यात काही जिल्ह्याबाहेरील लोकांना पकडण्यात आले. यावरूनही गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. याशिवाय मतदारांना प्रलोभने दाखविणे, धमकावणे, उमेदवारांविषयी समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करणे, निवडणुकीवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचे प्रकारही जिल्ह्यात झाले.
याशिवाय परवानगी न घेता बॅर्नर लावणे, प्रचार सभा घेणे अशा घटनाही घडल्या. यावरून पोलीस व निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्यांनी फिर्यादी होत पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद केली. काही नागरिकांनीही पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या.सर्वांधिक 14 गुन्हे संगमनेर व कर्जत- जामखेड मतदार संघात घडले. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये दोन अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पाच व घारगाव पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. कर्जत पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल झाले यामध्ये तीन अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. जामखेड पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले असून यामध्ये एक अदखलपात्र गुन्ह्याचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, नगर शहर, शिर्डी, शेवगाव- पाथर्डी, श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातही निवडणुकीसंदर्भातील गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस ठाणेनिहाय दाखल गुन्हे
संगमनेर शहर 8, संगमनेर तालुका 5, घारगाव 1, कर्जत 9, जामखेड 5, राहुरी 4, कोतवाली 1, शिर्डी 1, सोनई 1, श्रीरामपूर शहर 5, नेवासा 1, राजूर 1, तोफखाना 3, पाथर्डी 3, शेवगाव 1, पारनेर 1, बेलवंडी 2, राहाता 2, सुपा 1.