Tuesday, October 29, 2024
Homeनगरश्रीरामपुरात कांबळे, नेवाशात लंघे तर संगमनेरात खताळ

श्रीरामपुरात कांबळे, नेवाशात लंघे तर संगमनेरात खताळ

शिंदे शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची विधानसभा निवडणुकीसाठीच्या 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना, नेवाशातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंके आणि संगमनेरातून अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघातील विविध पक्षांचे उमेदवार जाहीर करण्यात आले. पण या महत्त्वाच्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळते याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. आता या उमेदवारी जाहीर झाल्याने या पक्षाच्यावतीने लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्र्रेस व अन्य पक्षांचे उमेदवार जाहीर झाले. पण शिंदे सेनेच्या उमेदवारांबाबत उत्सुकता होती. या मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे, प्रशांत लोखंडे यांच्यासह अनेकजण उत्सुक होते. अखेर कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीने शिवसेनेच्या शिंदे गटातून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात सुरू असलेली डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा संपुष्टात आली आहे. खताळ सध्या भाजपात आहेत. विखे गटाचे समर्थक म्हणून ते संगमनेर मतदारसंघात सक्रीय आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आणि संगमनेर मतदारसंघाचे भाजपा निवडणूक प्रमुखपद त्यांच्याकडे आहे. मात्र आता मित्र पक्षात प्रवेश करून ते निवडणूक रिंगणात उतरतील. त्यामुळे यापुढे डॉ.सुजय विखे पाटील आपल्या कार्यकर्त्यासाठी मतदारसंघात आक्रमक प्रचार करताना दिसून येतील, अशी शक्यता आहे.

दरम्यान नेवासा तालुका प्रतिनिधीने कळविले की, नेवाशातून उमेदवारी मिळण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच चालू असतानाच रात्री उशिरा अचानकपणे विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारीमुळे नेवासा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी असलेले विठ्ठलराव लंघे हे भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष असून नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी 2004 मध्ये नरेंद्र घुले पाटील यांचे विरुद्ध तर 2009 मध्ये शंकरराव गडाख यांचे विरुद्ध भाजपाचे तिकिटावर निवडणूक लढविली होती. दोन्ही वेळेस त्यांना थोड्या मताने पराभव पत्करावा लागला होता. 2009 मध्ये शंकरराव गडाख नेवास स्वतंत्र नेवासा मतदार संघाचे आमदार झाल्यानंतर लंघे गटामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यात आले होते. परंतु जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि नंतर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून जिल्ह्यामध्ये परिचित आहेत.

नेवासा विधानसभा मतदार संघांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आ.शंकरराव गड़ाख यांच्याविरुद्ध प्रबळ उमेदवारीचे दावेदार म्हणून शिवसेनेकडून उद्योजक प्रभाकर शिंदे तर भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंघे व इतर भाजपचे कार्यकर्ते उत्सुक होते. लंघे,मुरकुटे व शिंदे यांच्या तिकीटा करिता प्रचंड रस्सीखेच सूरु होती. त्याकरिता सर्वजण मुंबईमध्ये ठाण मांडून होते. सोमवार दि. 28 रोजी माजी आमदार मुरकुटे यांनी भाजप शिवसेना व अपक्ष असे तीन उमेदवारी अर्ज भरलेले होते. मात्र शिंदे व लंघे हे कोणतेही घाई न करता एकनाथ शिंदे व भाजप नेत्यांचे निर्णयाची वाट पाहत थांबून होते. अखेर शेवटच्या क्षणी विठ्ठलराव लंघे यांना शिवसेनेने तिकीट जाहीर केले आहे.आता लंघे यांना भाजपाला सोडचिठी देऊन शिवसेनेत प्रवेश करावा लागणार आहे.

आज मंगळवार दिनांक 29 हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने विठ्ठल लंघे हे आज उमेदवार अर्ज दाखल करतील. भाजपाच्या शायना एन. सी. यांना मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शायना एनसी या वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यांना वरळीतून उमेदवारी मिळू शकली नाही. मात्र, आता त्यांना शिवसेनेने (शिंदे) मुंबादेवीमधून उमेदवारी दिली आहे. शायना एनसी या लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंदखेडराजा मतदारसंघातून शशिकांत खेडेकर यांना, तर रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव हिनं काल शिवसेनेत प्रवेश केला होता. तिला देखील कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिंदे सेनेची तिसरी यादी- सिंदखेड राजा – शशिकांत खेडेकर, घनसावंगी- हिकमत उढाण, कन्नड- संजना जाधव, कल्याण ग्रामीण- राजेश मोरे, भांडूप पश्चिम- अशोक पाटील, मुंबादेवी- शायना एनसी , संगमनेर- अमोल खताळ, श्रीरामपूर -भाऊसाहेब कांबळे, नेवासा- विठ्ठल लंघे पाटील, धाराशिव- अजित पिंगळे , करमाळा- दिग्विजय बागल, बार्शी- राजेंद्र राऊत, गुहागर- राजेश बेंडल, पाठिंबा- जनसुराज्य हातकणंगले- अशोकराव माने , राजश्री शाहू विकास आघाडी, शिरोळ- राजेंद्र यड्रावकर

भाजप पदाधिकारी; उमेदवार सेनेचे
नगर जिल्ह्यात भाजप 5 जागा लढवत आहे. मात्र आता भाजपातील 2 पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाकडून लढताना दिसतील. नेवासा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेले विठ्ठलराव लंघे हे तर भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. तर खताळ अडीच वर्षांपासून संगमनेर मतदारसंघात भाजप पक्षवाढीसाठी सक्रीय होते. दोघांना पक्षाने एबी फॉर्म प्रदान केले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या