Thursday, November 21, 2024
Homeनगर31 ठिकाणी छापेमारी; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

31 ठिकाणी छापेमारी; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कची अवैध दारूविरोधात दोन दिवस मोहीम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने शनिवार व रविवार दोन दिवस विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील अवैध दारूवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान एकूण 31 ठिकाणी छापेमारी करत 13 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध दारू विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सहा. आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उप आयुक्त सागर धोमकर, अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने जिल्ह्यात शनिवार (9 नोव्हेंबर) व रविवार (10 नोव्हेंबर) अशी दोन दिवस विशेष मोहीम राबवून अवैध दारू विरोधात कारवाई केली. या कारवाईदरम्यान दारू विक्री, निर्मिती, वाहतूक तसेच हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली.

31 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 34 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे सात हजार 720 लिटर रसायन, एक हजार 350 लिटर हातभट्टी दारू, 120 लिटर देशी दारू, 39 लिटर विदेशी दारू, 15 लिटर बिअर व नऊ वाहने असा एकूण 13 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यामधील अवैध दारू निर्मिती, वाहतूक, विक्री करणार्‍यांची माहिती टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून द्यावी, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या