Saturday, July 27, 2024
Homeजळगावजळगाव लोकसभेत ‘उबाठा’कडून विधानसभेची तालीम

जळगाव लोकसभेत ‘उबाठा’कडून विधानसभेची तालीम

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपा विरुध्द उबाठा अशी लोकसभेची लढाई होत आहे. ही लढाई पुढे देखिल कायम राहणार असून शिवसेना उबाठा गटाकडून विधानसभेची रंगीत तालीम केली जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान जळगाव लोकसभा मतदारसंघातील सहाही विधासभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाकडून मशाल हे चिन्ह घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भाजपासह शिंदे गटातील आमदारांसाठी हे एक मोठे आव्हान ठरू शकते.

- Advertisement -

वाढत्या तापमानासोबत लोकसभा निवडणुकीचेही वातावरण तापू लागले आहे. जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट विरूध्द भाजपा अणि शिंदे, अजित पवार गट अशी लढाई होत आहे. शिवसेनेत राज्यातील सर्वात मोठे बंड जळगाव जिल्ह्यातून झाले. पाच आमदारांनी शिंदेंना पाठींबा दिला. त्यामुळे साहाजिकच ठाकरे गटाची ताकद या मतदारसंघात कमी झाली. त्यामुळे बंडखोरांना घेरण्यासाठी लोकसभेची जागा आपल्या पारड्यात पाडून घेत ठाकरे गटाने मशालीच्या माध्यमातून पुर्नबांधणीला सुरूवात केली. जळगाव लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची पेरणी करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे.


अशी असू शकते विधानसभेची तालीम
जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहरात भाजपाचे राजूमामा भोळे आमदार आहेत. आता उबाठा गटाकडून माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभुषण पाटील, विष्णू भंगाळे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मशाल चिन्ह घराघरात पोहचविण्यास त्यांचे प्राधान्य आहे. याची डोकेदुखी आमदार राजूमामा भोळे यांना होवू शकते. पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या समोर उबाठा गटाच्या वैशाली सुर्यवंशी यांचे कडवे आव्हान असेल. त्या देखील मतदारसंघात मशाल चिन्ह पोहचविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. करण पवार लोकसभा निवडणुकीत यश न आल्यास ते विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांच्याविरोधात पारोळा-एरंडोल मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरतील, अशीही अटकळ बांधली जात आहे.

जळगाव ग्रामीणमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर उबाठा गटातून इच्छूकांचे आव्हान असेल. अमळनेर येथे मशाल चिन्ह घराघरात पोहचले तर माजी आमदार शिरीष चौधरी हे उबाठाचे उमेदवार असू शकतील. यामुळे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढू शकतात. चाळीसगावमध्ये उबाठा गटाचे नेते व माजी खासदार उन्मेश पाटील विरुध्द भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण अशीच लढत रंगणार आहे. या लढतीत माजी आमदार राजीव देशमुख यांची भुमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे 2024 ची लोकसभा निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची रंगित तालिम मानली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या