शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
विधानसभेत आमच्या आर.पी.आय पक्षाला श्रीरामपूर सह सात-आठ जागा द्याव्यात, अशी मागणी केंद्रीय मंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिर्डीत केली़. आरपीआय राष्ट्रीय पक्ष असूनही महायुतीतील नेते त्यांच्या कार्यक्रमाला आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सहभागी करून घेत नाहीत़ त्यामुळे पक्षात नाराजी आहे़ शासन आपल्या दारी आणि आम्ही आमच्या घरी असा दुजाभाव असल्याचा टोलाही आठवले यांनी लगावला़ शिर्डीतून मला उमेदवारी दिली असती तर जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून आल्या असत्या, असा दावाही त्यांनी केला़ एक्झीट पोलचे रिपोर्ट वेगळे येतील, त्यांना आपल्या तांत्रिक बाजू मांडण्याचा अधिकार आहे़ पण जनतेच्या मनात काय आहे ते पोल मध्ये बर्याचदा कळत नाही़ यामुळेच लोकसभेचेही अंदाज चुकले़ यावेळी आम्ही अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत़ त्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही़. आमच्या महायुतीच्या 170 पेक्षा अधिक जागा निवडून येतील, असा दावा ना.आठवले यांनी शिर्डीत व्यक्त केला.
राज ठाकरेंचा आम्हाला लोकसभेला फायदा झाला नाही, उलट नुकसानच झाले़ आता ते सगळ्या जागांवर लढणार असतील तर आम्हाला त्याचा फायदाच होईल़ राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण निवडून येण्या इतपत मते पडत नाहीत. मराठा आरक्षणामुळे फार नुकसान होईल असे वाटत नाही़ जरांगे यांच्या सभेला गर्दी होते पण सगळेच मराठे त्यांच्याबरोबर आहेत असे नाही़ बाळासाहेब ठाकरेंच्या सभेलाही मोठी गर्दी असायची पण त्यांनाही मते मिळायची नाहीत. एखादा उमेदवार निवडून यायचा. नंतरच्या काळात मात्र त्यांचे चांगले उमेदवार निवडून आले, असे ना. आठवले यांनी सांगितले़.
राज्यात बच्चू कडू यांच्या तिसर्या आघाडीलाही मते मिळणार नाहीत व प्रकाश आंबेडकरांना तर मागच्या लोकसभेपेक्षाही कमी मते मिळतील असा दावा ना. आठवले यांनी केला़ विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागा जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे़. आम्ही भाजपाच्या गटात असल्याने त्यांच्या कोट्यातून आम्हाला एक जागा द्यायला हवी़ सात जागा जाहीर झाल्या पण आचारसंहितेमुळे उर्वरीत पाच जागांचे काय करणार माहीत नाही पण त्यात तरी आम्हाला एक जागा द्यावी, अशी अपेक्षा ना. आठवले यांनी यावेळी व्यक्त केली़. येथील शासकीय विश्रामगृहावर दुपारी आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राहाता तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, रिपाइंचे श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, रमेश मकासरे, सुरेंद्र थोरात, पप्पू बनसोडे, सुनील साळवे, रमेश शिरखंडे, दीपक गायकवाड, नाना त्रिभूवन, धनंजय निकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते़.