वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
शहरातील म्हसोबा चौकात असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम व सीडीएम मशीन फोडून सुमारे अकरा लाख 39 हजार रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्यावर्षी याच बँकेचे एटीएम फोडून चोरट्यानी लाखो रुपये लंपास केले होते. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर शहरांत म्हसोबा चौकात आयडीबीआय बँकेचे एटीएम व सीडीएम मशीन आहे. शुक्रवारी मध्यरात्री या बँकेची ही दोन्ही मशीन गॅस कटरने कापून त्यातील रक्कम लंपास केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यानी एटीएम मशीनमधून चार लाख चार हजार 200 रुपये व सीडीएम मशीन मधील सात लाख 34 हजार 800 रुपये चोरून नेले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक गोविंद निर्मल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे हे करत आहेत.