मनमाड | प्रतिनिधी | Manmad
येथे काल गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकाला संशयास्पद हालचालीवरून पोलीस आणि एटीएसने ताब्यात घेतले होते. या कारवाईमुळे मनमाडसह नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
संशयिताची मनमाड येथे ७ तास कसून चौकशी केल्यानंतर तो व्यक्ती डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीवर तपास यंत्रणा लक्ष ठेवून होती. आयबीने स्थानिक मनमाड पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत होते.
त्यानंतर संशयित व्यक्ती छत्रपती संभाजीनगरकडे जाताना नगरसूल येथे आरपीएफच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन आणि मनमाड पोलिसांच्या स्वाधीन केले. मनमाड पोलिसांनी त्या संशयिताला एटीएस पथकाच्या ताब्यात दिले.
यानंतर एटीएस पथकाने संशयिताची कसून चौकशी केली. चौकशीअंती तो डॉक्टर असल्याचे आढळल्याने त्यास सोडून देण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.