अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे पाडली. हिंदू संस्कृती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला. त्यामुळे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याबाबत जनतेच्या भावनेचा आदर करून निर्णय घेतला पाहिजे, अशी भूमिका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केली.
पालकमंत्री विखे यांच्या हस्ते जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने नगरच्या तांबटकर मळा येथे आयोजित विभागीय साईज्योती सरस 2025 या महोत्सवाचे उदघाटन झाले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. यावेळी मंत्री विखे म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीबाबत कोण काय म्हणते, यापेक्षा जनभावना ही महत्त्वाची आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे काय म्हणतात. हे महत्वाचे नाही. काहीजण इतिहासाची माहिती होण्यासाठी औरंगजेबाची कबर आवश्यक आहे, असे म्हणतात. परंतु, त्यांनी तरी इतिहास वाचला आहे का? त्यांनी इतिहास वाचला असता तर औरंगाजेबाने सत्ताकाळात किती त्रास जनतेला दिला, हे समजले असते.
इतिहासाची माहिती होण्यासाठी कबर असणे हे महत्वाचे नाही. सुपा एमआयडीसीमधील वातावरणाबाबत खासदार नीलेश लंके यांनी नाव घेऊन बोलावे? असे जाहीर आव्हान दिले होते. आपण संबंधितांशी दोन हात करण्यास तयार आहोत ? या खासदार लंकेंच्या आव्हानावर मंत्री विखे यांनी हा विषय फार शुल्क आहे. या विषयावर आपण बोलणे संयुक्तिक ठरणार नाही.
बचत गटाच्या मॉलला निधी देणार
बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला प्रत्येक तालुकापातळीवर मॉलसाठी जागा दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद केली जाईल, असे आश्वासनही दिले. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची वर्गवारी करण्यात येऊन त्या पद्धतीचे मार्केटींग तयार करण्यात यावे. उमेद मॉलच्या माध्यमातून बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीमध्ये एक मोठे परिवर्तन येणार आहे. उत्पादित मालाची ऑनलाईन विक्रीची सुविधा सुरु करण्यात आली आहे. ही अधिक व्यापक स्वरुपात होण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिली.