डॉ. अरुण स्वादी
वेस्ट इंडिजमधला सोमवारचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी आनंदोत्सव ठरावा. सर्वप्रथम भारतीय ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि विश्वचषक स्पर्धेतल्या पराभवाचे उट्टे काढले. त्यानंतर अतिशय चुरशीच्या लढतीत अफगाणिस्तानने बांगलादेशवर मात केली आणि आवश्यक दोन गुण मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरी गाठायच्या सार्या आशांवर पाणी फेरले गेले.
थोडक्यात, भारत आणि अफगाणिस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट जगतातील अनभिषिक्त सम्राट ऑस्ट्रेलियाला टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतून बखोटीला धरून बाहेर काढण्यात आले. ही गोष्ट निश्चितच आनंददायक आहे. कारण गेले दोन एक वर्ष ऑस्ट्रेलियाचा संघ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये सारे काही जिंकत होता. टेस्ट चॅम्पियनशिप पण त्यांनी जिंकली होती. त्यांचा अश्वमेध अडवणे कुणाला शक्य होत नव्हते, पण त्यामुळे त्यांचा उर्मटपणा व उद्दामपणा वाढला होता. तसेही सुसंस्कृत ऑस्ट्रेलियन टीम क्वचितच पाहायला मिळते. सध्याच्या टीममधले बरेचसे खेळाडू, अगदी पॅट कमिन्ससारखा खेळाडूदेखील भारताबद्दल वाटेल ते बोलत होता.
ऐंशी हजार भारतीय क्रिकेट रसिकांना चिडीचूप करण्याचा आनंदच वेगळा, असे काहीसे स्टेटमेंट त्याने वन-डे विश्वचषक जिंकल्यावर काढले होते. मात्र, जे वर जाते ते खाली येतेच हा निसर्गाचा नियम आहे. थोड्याच दिवसांत त्यांच्या संघावर आणि पर्यायाने प्रेक्षकांवर हीच वेळ आली. साध्या उपांत्य फेरीतसुद्धा त्यांना प्रवेश करता आला नाही. शेराला सव्वाशेर भेटतोच आणि गर्वाचे घर खाली होणार हेसुद्धा क्रमप्राप्त आहे. भारत आणि अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा झालेला पराभव म्हणूनच फार आनंददायी घटना आहे. क्रिकेट विश्वाच्या दृष्टीनेदेखील तो शुभशकुन आहे.
या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने अफलातून फलंदाजी केली. डावर्या सीमर्सविरुद्ध त्याला खेळता येत नाही, अशी चर्चा काही दिवसांपासून चालू होती. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला त्याने ज्या पद्धतीने बडवले ते पाहून टीका करणार्यांची दातखीळ बसली असेल. त्याने सर्व ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या ठिकर्या उडवल्या. तरीही फटकेबाज ट्रॅविस हेड आणि मॅक्सवेल हा सामना कांगारूंना जिंकून देतात का? असे वाटून गेले, पण येथे पुन्हा एकदा कुलदीप यादवची जादू चालली. गोलंदाजीत तो आणि बुमराह हे आपले दोन हुकमाचे एक्के आहेत. या विजयामुळे भारताने ऑस्ट्रेलियाची सद्दी संपवली, असे म्हणायला हरकत नाही.
अफगाणिस्तानने तर ऐतिहासिक कामगिरी केली.परंतु त्यांच्या फलंदाजांनी सुरुवात बरी होऊनही अतिशय संथ खेळ केला. खेळपट्टी फटकेबाजीसाठी अनुकूल नव्हती, पण इतका सावध खेळ त्यांच्या जीवाशी येऊ शकतो, असे वाटत होते आणि झाले तसेच. बांगलादेशची फलंदाजी सध्या फर्स्ट गिअरमध्ये चालते आहे म्हणूनच ते वाचले. अर्थात कर्णधार राशीद खानचा अप्रतिम लेगस्पिन गुगली मारा आणि नवीन उल हकची दडपणा खालची गोलंदाजी या गोष्टी निर्विवादपणे त्यांच्या विजयाला कारणीभूत ठरल्या. हा अफगाणिस्तान संघ मोठ्या स्पर्धांमध्ये नुसता भाग घेण्यासाठी येत नाही तर इतर संघांना धक्के देत तो चॅम्पियन बनू शकतो, एवढा मोठा विश्वास या विजयाने त्यांनी दिला आहे. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल तर ते दक्षिण आफ्रिकेला हरवू शकतात. मात्र, शमसीला कसे खेळायचे याचे धडे त्यांनी प्रशिक्षक जोनाथन ट्रॉटकडून शिकून घ्यायला हवेत.