नाशिक । प्रतिनिधी Nashik
पहिल्या एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागंला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ६६ धावांनी विजय मिळाला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला बुमराह, शमी यांचा नेटाने सामना केल्यानंतर फिंच आणि वॉर्नर या जोडगोळीने मैदानावर स्थिरावत धावांचा वेग वाढवला. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. अखेरीस मोहम्मद शमीने वॉर्नरला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाची जोडी फोडली. वॉर्नरने ६९ धावा केल्या. वॉर्नर माघारी परतल्यानंतर स्टिव्ह स्मिथने फिंचला उत्तम साथ दिली .
कर्णधार फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांची धडाकेबाज शतकं आणि त्यांना डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत दिलेली उत्तम साथ या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन-डे सामन्यात ३७४ धावांपर्यंत मजल मारली . आयपीएल गाजवणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. फिंचने ११४ तर स्मिथने १०५ धावांची खेळी केली. स्मिथने कॅरीच्या साथीने आपलं शतक झळकावत ऑस्ट्रेलियाला भक्कम धावसंख्या उभारुन दिली. ऑस्ट्रेलिया ने ३७४ धावांचा डोंगर उभारला.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी ५३ धावांची भागीदारी केली. हेजलवूडने अग्रवालला माघारी धाडत टीम इंडियाला पहिला धक्का दिला, त्याने २२ धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने बाद झाले एका क्षणाला टीम इंडियाची अवस्था ३ बाद ८० अशी होती. यानंतर लोकेश राहुलनेही निराशा करत माघारी परतण पसंत केलं. ४ बाद १०१ अशा संकटात सापडलेल्या टीम इंडियाला अखेरीस शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी सावरलं या फलंदाजांनी १२९ धावांची भागीदारी केली.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया ३०८ धावांपर्यंतच मजल मारु शकली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने ९० तर शिखर धवनने ७४ धावांची खेळी केली, परंतू त्यांचे प्रयत्न व्यर्थच ठरले.