श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
पिस्तूलाचा धाक दाखवून एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेला आरोपी सागर बेगचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. साळवे यांनी फेटाळून लावला असून, 29 ऑगस्ट रोजी दिलेला अंतरिम जामीन आदेशही रद्द केला आहे. नेमके प्रकरण काय? पीड़ित महिलेने सुरुवातीला आपल्या आईसह शिर्डी पोलीस ठाण्यात शून्य एफआयआर नोंदवला होता, जो नंतर पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. फिर्यादीनुसार, सहआरोपी बाबू साळवे याच्या खोलीत सागर बेग आणि सोनू बेग हे पिस्तुलासह उपस्थित होते. या तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून आणि आरोपींच्या नावाने दबाव आणून महिलेला सहआरोपीसोबत संबंध ठेवण्याची धमकी दिली तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एन. आर. कहाणे यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल अद्याप हस्तगत झालेले नाही, त्यामुळे आरोपीची कोठडीत घेऊन चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. आरोपीवर यापूर्वी 25 गुन्हे नोंद असून त्याच्या गुन्हेगारी पूर्वचरित्रामुळे जामीन मिळाल्यास तो फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणू शकतो.
दरम्यान, फिर्यादी महिलेने नंतर न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर करत आपल्यावर एफआयआरसाठी मानसिक दबाव होता, असा दावा केला होता. मात्र, पोलिसांनी हा दावा कोर्टात उघडा पाडला. एफआयआर नोंदवताना संपूर्ण मजकूर तक्रारदार महिलेला वाचून दाखवला गेला होता, आणि तिने तो मान्य केला होता, या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांकडे उपलब्ध असल्याने फिर्यादीच्या बदललेल्या भूमिकेमागील दबाव न्यायालयाच्या निदर्शनास आला.
उपलब्ध कागदपत्रे, पीड़ित महिलेच्या आईचा जबाब, आरोपीचे 25 गुन्ह्यांचे पूर्वचरित्र आणि अद्याप न जप्त झालेले पिस्तूल या सर्व बाबींची दखल घेत न्यायालयाने सागर बेगचा अटकपूर्व जामीन फेटाळला. या निर्णयामुळे श्रीरामपूर पोलिसांना आरोपीला ताब्यात घेऊन कोठडीत सखोल चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




