आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा स्वातंत्र्यासाठी भाषेची तलवार उपसणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणाले होते की ‘इंग्रजी वाघिणीचं दूध पिऊन मराठी जास्त धष्टपुष्ट होईल.’ आता तर आपण स्वतंत्र आहोत, समृद्धही होत आहेत. अशा वेळी नव्या आत्मविश्वासानं आपण जगभरच्या ‘इंग्रजी’च काय, सर्व वाघिणींचं दूध पिऊन, वैश्विक संस्कृतीतलं ‘उत्कट भव्य तेचि घेऊन’ ‘मिळमिळीत अवघेचि’ टाकून देऊन आपण अधिक समृद्ध होऊ शकतो, जगाला अधिक समृद्ध करू शकतो. कारण ‘अवघे विश्वचि माझे घर’ हीच मराठीपणाची मराठी भाषेची मूळ धारणा आहे.
आपण भारतीय (मराठी) म्हणून जन्माला आलो, तर मागच्या आणि पुढच्या सात जन्मांचे माहीत नाही, पण या जन्मात तरी ते मराठी-भारतीयपण आपल्याशी एकरूपच आहे. आणि मागच्या आणि पुढच्या सात पिढ्यांचेही सांगता येते. हे आता विज्ञानाने, जेनेटिक्स्ने सप्रमाण सिद्ध केलेय की ज्या कुटुंब-भाषा-प्रदेशात आपण जन्माला आलो त्याचे प्रभाव-परिणाम पुढच्या सात पिढ्यांमध्ये प्रकट होत राहतात. त्या पिढ्या जर मुळे उखडलेल्या, आधारहीन व्हायच्या नसतील तर आपल्या ‘स्व’त्वाची – भाषा-इतिहास-संस्कृतीची पाळेमुळे पक्की समजावून घेऊन, आपल्या स्वतंत्र बुद्धीने त्यामध्ये नवी भर घालून आपली भाषा-इतिहास-संस्कृती अधिक समृद्ध करतच विश्वाच्या एकात्म ‘स्व’त्वाकडची वाटचाल करायला हवी.
तसे आपण मराठी-भारतीय कुटुंबामध्ये जन्माला आलो ना, तर आता आपल्या खांद्यावर तो मराठी-भारतीय झेंडा आहेच. तो जन्मजात आहे, जन्मभर आहे. तो खाली ठेवू म्हटले तरी ठेवता येत नाही. कारण आपले अस्तित्व हाच आपल्या संस्कृतीचा झेंडा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आधी जगभर भारताचे प्रतिनिधित्व करताना सुटाबुटात जायचे. त्यांना पॅरिसच्या परिषदेत कोणातरी विलायती विद्वानाने विचारले की तुमच्या देशाला स्वत:ची काही वेशभूषा आहे की नाही? त्यानंतर पंडितजी भारताचे प्रतिनिधित्व करताना कटाक्षाने सलवार-कुडता-जॅकेट परिधान करत असत. गुरुदेव टागोरांनी जपानमधील विद्यापीठात भारतीय संस्कृतीच्या, अध्यात्म विचाराच्या थोरवीबाबत प्रभावी भाषण दिले. जागतिक बंधुता आणि शांतता भारतीय अध्यात्म विचाराच्या अनुकरणामुळे प्रस्थापित होईल असे सांगितले. ते सर्व मनापासून ऐकून एका जपानी विद्यार्थ्याने नम्रपणेच विचारले होते की, गुरुदेव आपले विचार थोर आहेत, आम्ही त्याने प्रभावित झालो आहोत, पण कृपा करून हे सांगा की ज्या देशाला स्वत:चे स्वातंत्र्य टिकवता येत नाही अशा परतंत्र, गुलाम देशाचे आम्ही-जगाने अनुकरण का करावे!
ज्याला आपले ‘स्व’त्व समजते तोच नवेनवे अनुभव घेत, नव्या भाषा-तंत्रज्ञान शिकत मूळ ‘स्व’त्व समृद्ध करू शकतो. कुसुमाग्रजांच्या ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’यातील काही ओळी आहेत-
परभाषेतही व्हा पारंगत
ज्ञानसाधना करा तरी
माय मराठी मरते इकडे
परकीचे पद चेपू नका
ते असे म्हणतात कारण ते काही इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषा-संस्कृतीचे शत्रू आहेत म्हणून नव्हे, तर त्यांना हे उमगलेले आहे, की
भाषा मरता देशहि मरतो.
संस्कृतीचाही दिवा विझे
आपल्या भाषा-संस्कृतीवर प्रेम करायला दुसर्याचा द्वेष करायची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे आपल्या भाषेच्या, संस्कृतीच्या अभ्यासातून तयार होणार्या सार्थ जाणिवेची.
मराठी (भारतीय) माणूस आता जगभर जातो आहे. गेलेच पाहिजे. मूळ भारतीय नागरिकत्व ठेवून 16 निवडक देशांचे नागरिकत्व घेता येते-त्यात ब्रिटनसहित युरोपमधले अनेक देश आहेत. तंत्रज्ञानाने जग इतके जवळ आणलेय, जोडलेय की खरोखरच त्या तंत्रज्ञानाचा विधायक वापर करून आपल्याला जगाच्या पाठीवर सर्वत्र संपर्कात राहता येईल, भाषा शिकता येईल, जतन करता येईल, मराठी रेडिओ-टीव्ही स्टेशन्स चालवता येतील. (आपले अनेक मित्र खरोखरच असे उपक्रम करतायत.) उत्तम मराठीचे अभ्यासक्रम तयार करून ते इंटरनेटवर, सॉफ्टवेअरवर किंवा ‘संडे स्कूल्स’मधून शिकता-शिकवता येतील.
महाराष्ट्रातल्या शिक्षणसंस्थांशी जगभराच्या मराठी माणसाला जोडता येईल. जगभर गेलेला मराठी माणूस तिथल्या शिक्षणसंस्थांसहित ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते’ भारताशी-महाराष्ट्राशी जोडू शकेल. जगभर त्यानं आपापल्या क्षेत्रात मिळवलेल्या तज्ज्ञतेचा उपयोग भारताला करून देता येईल. ज्यांच्याकडे तज्ञतेबरोबरच आर्थिक भांडवलही आहे, ते नव्या गुंतवणुकीतून भारताच्या विकासाला, रोजगारनिर्मितीला हातभार लावू शकतील. जगभर जीवनानुभव घेतलेल्या मराठी माणसाने तो अनुभव, विस्तारलेली दृष्टी महाराष्ट्रामध्ये सांगितली तर मराठी मनाचीही ‘वैश्विक जाणीव’ व्यापक व्हायला मदत होईल. उदाहरणार्थ मराठी भाषा टिकण्याचे-अस्तित्वाचेच आव्हान आहे. मराठी शाळा बंद पडताहेत. सर्वांना इंग्लिश मीडियममधून शिकायचेय. इंग्लिश भाषेच्या आक्रमणाचे हे आव्हानही केवळ मराठी भाषेसमोरच आहे असंही नाही, तर ते तेलुगू, कन्नड, गुजराथी, बंगाली, तमिळसहित फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश भाषांसमोरही आहे. या वैश्विक आव्हानाला उत्तर ‘बायलिंगोलिझम’आहे. इथून पुढच्या काळात प्रत्येक व्यक्तीने किमान 2 भाषांमध्ये उत्तम असायला हवे-अशी शिक्षणाची व्यवस्था असायला हवी –
उदाहरणार्थ आपण सगळ्यांनीच इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये उत्तम असायला हवं. आजही मराठी भाषा बोलणार्याची संख्या लक्षात घेतली तर संपूर्ण जगात मराठीचे स्थान तेराव्या क्रमांकावर येते. बारा कोटींहून जास्त लोकांची मातृभाषा मराठी आहे – म्हणजे जपानच्या लोकसंख्येएवढी. जपानमधल्या प्रवासात मी पाहिले की जपानी भाषा, संस्कृती न सोडता जपानने सर्व आधुनिकीकरण आत्मसात केलेय. पदवी, पदव्युत्तर, पीएचडीसकट पार मेडिकल, इंजिनिअरिंग… असे सर्व शिक्षण जपानी भाषेतून घेता येते. जपानी पुस्तकांची आठ-आठ मजली भव्य दुकाने आहेत. मला वाटत राहते की मराठीलाही हे शक्य आहे. एक भाषा म्हणून ती ताकद, ते व्याकरण, ती शब्दसंख्या आणि नवेनवे शब्द, नव्या संज्ञा, नव्या संकल्पना स्वीकारण्याएवढी लवचिकता हे सर्व काही मराठी भाषेकडेही आहे. म्हणजे मराठी भाषेचे ‘फंडामेंटल्स’ पक्के आहेत. अमेरिकेतल्या शिकागो आणि कोलंबिया विद्यापीठांत कॅनडातल्या क्विन्स युनिव्हर्सिटीत आणि मॉस्कोसहित काही ठिकाणी मराठी भाषेचे स्वतंत्र विभाग आहेत (भारतातच नाहीत.)
गणेशोत्सवात आरतीनंतर आपण जी मंत्रपुष्पांजली म्हणतो त्यात वेदकाळापासून चालत आलेला मंत्र आहे ‘पृथिव्यै समुद्रपर्यंताया: एकराळिती…’या सर्व पृथ्वीचं एक-एकात्म राष्ट्र होवो-विश्वाच्या एकात्मतेच्या जाणीवेवरच आपली जोपासना झाली आहे. आपण ‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु’ – सर्व सुखी होवोत-अशी प्रार्थना करणार्या संस्कृतीचे पाईक आहोत, जगात कुठेही राहिलो तरी.
आता जगात कुठेही असलो तरी मराठी-महाराष्ट्र-भारताच्या भल्यासाठी काम करता येतं आणि मराठी भाषेतूनही, महाराष्ट्र-भारतातून जगाच्या भल्यासाठी काम करता येते. ‘अवघे विश्वचि माझे घर’प्रमाणे ‘ये देशी हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा’ ही सुद्धा मराठीपणाची, मराठी भाषेची मूळ धारणा आहे. मला वाटते की ‘अवघे विश्वचि माझे घर’ आणि ‘हिंदवी स्वराज्य’ हे मराठी माणसाच्या जेनेटिक कोडच्या ‘डबल हेलिक्स’ला घडवणारे दोन धागे आहेत. या धाग्यांमध्ये सारे विश्व गुंफता येईल.
अविनाश धर्माधिकारी