नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. दहशतवादी हल्ला करणारा युवक पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. त्याने आयएसआयकडून प्रशिक्षण घेतले होते. हल्ला करण्यासाठी त्याने राम मंदिराची रेकी केली होती. रामनवमीच्या आधीचा दहशतवादी हल्ला उधळून लावण्यात यश आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
अब्दुल रहमान (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील फैजाबाद (अयोध्या) येथील रहिवासी आहे. संशयिताला फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. त्याने योजना अंमलात आणण्यापूर्वी गुजरात अँटी टेररिस्ट स्कॉड आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त ऑपरेशन करुन त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला संशयित अब्दुल रहमान हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता आणि अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट आखत होता. रेहमान फैजाबादमध्ये मटणाचे दुकान चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. तो अनेक कट्टरवादी लोकांच्या संपर्कात आला होता. दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीनंतर आयएसआयने भारतात मोठा दहशतवादी कट रचण्याची योजना आखली होती, ज्यामध्ये अयोध्येतील राम मंदिर प्रमुख टार्गेट आहे.
अब्दुल रहमानने यापूर्वीही अनेकवेळा अयोध्येतील राम मंदिराची रेकी केली असून तेथील सुरक्षा व्यवस्थेच्या संबंधित महत्त्वाची माहिती ISI ला शेअर केली होती. राम मंदिरावर हँड ग्रेनेडने हल्ला करून मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश होता. ही कारवाई करण्यात गुजरात एटीएसची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. एटीएसला एक संशयीत दहशतवादी भारतात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती, दहशतवादी संघटनेच्या सूचनेनुसार मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. या माहितीच्या आधारे गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने सापळा रचून संशयिताला अटक केली.
तपासानुसार अब्दुल रहमान फैजाबादहून ट्रेनने फरीदाबादला पोहोचला होता, तिथे एका हँडलरने त्याला हँडग्रेनेड दिले. ट्रेनने अयोध्येला जायचे आणि तिथे हल्ला करायची अशी योजना होती. याआधी सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली. गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाई करत रविवारी अब्दुल रहमानला पकडले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा