Friday, April 25, 2025
Homeशब्दगंधआजीची लगबग

आजीची लगबग

अलका दराडे

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…

- Advertisement -

बाळाच्या जन्माने आजीला आस्मान ठेंगणे होते. सून सोनपावलांनी घरात आली होती नि आता तर तिच्या हातातले बाळ म्हणजे आजीच्या तळहातावरचा फोड. त्याला किती जपू नि किती नको असे तिला होते. आजीला नातू किंवा नात दोन्ही जिव्हाळ्याचे, मायेचे नि कौतुकाचेही! कशी असते ना आजीची माया नाजूकशा मोरपिसासारखी. घरात सगळ्यांना सांभाळून घेणारी नि सर्वांसाठी त्यागालाही तयार असणारी! बाळाच्या येण्याची चाहूल लागली की त्याच्या जन्मापूर्वीच आजी जुन्या कॉटनच्या साड्यांचे मऊ मऊ दुपटे शिवून ठेवते. बाळाच्या दुपट्यांना जुनी साडी वापरते कारण वापरून मऊ झालेली असते नि आता बाळाच्या अंगाला टोचणारही नाही. लंगोट नि बाळाच्या कानाला व डोक्याला संरक्षण म्हणून टोपडेही शिवून ठेवते. आजीच्या प्रेमाच्या या मऊसूत कपड्यांमधे नवजात बालक छानपैकी विसावणार असते. काम करता करता तिचे आपल्या मनाशीच हितगुज चालू असते. बाळाबरोबर बोबड्या बोलात बोलायला मिळणार म्हणून आजीचा चेहराही फुलून आलेला असतो. बाळंतिणीच्या खोलीत सुंदरसा पाळणा येतो. त्याला वर रंगीत खेळणी बांधलेली म्हणजे ती पाहून बाळाच्या मनाला छान वाटेल. त्यात एखादे बारीक आवाज करणारे खेळणेही बांधलेले असते अगदी जास्वंदीच्या फुलागत लटकलेले. चांगल्या कापडाचे पडदे लावून आजीच्या देखरेखीखाली बाळ नि बाळांतिणीची खोली त्यांच्यासाठी सज्ज असते.

आजीची पोतडी तर आपल्याला चांगलीच माहीत आहे. घरात उपयोगी येतील अशा गोष्टी हमखास त्यात असतात. आता ती बाळासाठी बाळगुटी तयार करते. यातील औषध बाळाचे शरीर सुदृढ करतात. यात वेखंड, अश्वगंधा, जायफळ, सुंठ, खारीक, बदाम, जेष्ठमध यांसारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा समावेश असतो. ही बाळगुटी पाण्यात किंवा आईच्या दुधात मिसळून बाळाला पाजतात. सहाणेवर या पाणी किंवा दुधाचा एक एक थेंब टाकत या आयुर्वेदिक वनस्पती दोन ते तीनवेळा उगळून घेतलेल्या असतात. या सर्व वस्तू आजी बरोबर आठवणीने घरात ठेवते. तिला आपल्या बाळाला छानसे बाळसे आलेले पाहायचे असते ना! बाळांतीण दवाखान्यातून बाळाला घेऊन आली की आजीची मोठी लगबग होते. दारात भाकर तुकडा व पाणी घेऊन ती त्या दोघांवरून मोठ्या मायेने ओवाळून टाकते व मोठ्या कौतुकाने बाळाला त्याच्या आईबरोबर घरात घेते. आला गं माझा चिमणा राजा असे बोलत ती त्या बाळाशी संवादही साधते. बरं ते गोंडस बाळही हसते जणूकाय आपल्या मायेच्या आजीच्या बोलण्याला ते प्रतिसादच देत असते.

क्रमशः

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...