Friday, June 21, 2024
Homeनगरबबनराव घोलपांचा पदाचा राजीनामा

बबनराव घोलपांचा पदाचा राजीनामा

नाशिक |प्रतिनिधी| Nashik

- Advertisement -

देवळाली मतदारसंघाचे 25 वर्षे प्रतिनिधित्व केलेले शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील पहिले आमदार, माजी समाजकल्याण मंत्री, नेते आणि उपनेते बबनराव घोलप यांना संपर्कप्रमुख पदावरून हटवल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात आणि ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

शिवसेना ठाकरे गट शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यामुळे नाराज झालेले माजीमंत्री बबनराव घोलप यांनी आता उपनेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे बबनराव घोलप पुढे कोणता राजकीय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान या मतदारसंघाचे पंचवीस वर्षे बबनराव घोलप यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यानंतर त्यांचे सुपुत्र माजी आमदार योगेश घोलप यांनी पाच वर्षे या मतदारसंघात आमदार म्हणून काम केले आहे.

तीस वर्षांच्या काळात एकदा या मतदारसंघाला लाल दिवा मिळाला होता बबनराव घोलप यांना समाजकल्याण मंत्री पद मिळाले होते. 2019 ला नवीन उमेदवाराला संधी द्यायची म्हणून सरोज आहिरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ खेचून आणण्यात यश आले होते. घोलप यांना शिर्डी लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी देण्याचे कबूल केले होते. त्यासाठी त्यांनी पाठपुरावाही केला होता. पण काही दिवसांपूर्वी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षात घेऊन घोलप यांना मोठा धक्का दिला आहे शिवाय लोकसभा संपर्क नेते प्रमुखांची जबाबदारी माजी आमदार विलास शिंदे यांच्याकडे दिल्यामुळे घोलप यांचा पत्ता कट झाल्याची चाहूल लागल्याने घोलप आणि उपनेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. या राजकीय घडामोडीमुळे ठाकरे गटाची उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा दौरा मला कळवण्यात आला नाही.भाऊसाहेब वाकचौरे गद्दार होते ते शिवसेना सोडून गेले होते. वाकचौरेंनी कोर्टात केलेल्या केसेस सुरु आहेत पण त्यांना पक्षात घेतलं. ते वाकचौरे आता प्रचार करत असताना, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. वाकचौरेंना जर उमेदवार करायचे होते, तर मला का सांगितलं? असा सवाल बबनराव घोलप यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळी पाहणी दौर्‍यात वाकचौरे यांनाच पुढे पुढे करण्यात आले. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे कॅमेर्‍याजवळ जात होते त्यावेळी मिलिंद नार्वेकर वाकचौरेंना पुढं ढकलत होते. त्यानंतर मी घरी गेलो उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार होतो. पण दुसर्‍याच दिवशी सामनामध्ये माझं संपर्कपद काढून घेतल्याचे छापून आले. माझ्याशी अशी वागणूक असेल तर शिवसैनिकांचं काय असेल म्हणून मी हातानं राजीनामा लिहिला आणि व्हाटसअपवर राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला, असं बबनराव घोलप म्हणाले.

मी त्यांना कालच राजीनामा पाठवला आहे. खासदार संजय राऊत यांनी मला बोलावलं आहे. मी उद्या (सोमवारी) त्यांच्या भेटीला जाणार आहे. मी गेली 55 वर्ष शिवसेनेत काम करतो आहे. 1968 ला माझ्या शाखेचं उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. मी 55 वर्षे झाले, शिवसेनेत काम करत आहे, त्यांनी मला काढून टाकावं, मी बाहेर जाणार नाही, असं बबनराव घोलप यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या