राहाता |प्रतिनिधी| Rahata
बाभळेश्वर बसस्थानक परिसरात बिंगो चक्री, मटका, जुगार तसेच नगर-मनमाड महामार्ग लगतचे हॉटेलमध्ये देहविक्री व्यवसाय खुलेआम सुरु असून एलसीबी तसेच स्थानिक पोलिसांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. आर्थिक तडजोडी होऊन खुलेआम हे व्यवसाय सुरू असल्याने युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे बसस्थानक परिसरात अवैध व्यावसायिकांनी चांगलाच जम बसवला आहे. जुगार, मटका खुलेआम सुरू आहे तर महामार्गालगतच्या हॉटेलमध्ये खुलेआम देहविक्री व्यवसाय केला जातो.
यासाठी अनेक पंटर काम करतात. यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. याबाबत स्थानिकांनी अनेकदा तक्रारी करूनही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. अनेक तरुण बिंगो चक्री, जुगार, मटका आदींमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा हरतात. पर्यायाने नैराश्याकडे झुकलेला हा तरुण व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. याबाबत नागरिकांनी स्थानिक पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र पोलीस व अवैध व्यावसायिकांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने पोलिसांकडून कारवाई होत नाही.
बाभळेश्वर येथे पोलीस चौकी आहे. येथे कधीतरी पोलीस हजर असतात. एलसीबी, स्थानिक पोलीस तसेच गाव पुढार्यांना देखील या अवैध व्यावसायिकांकडून रसत पुरवली जाते. त्यामुळे हे व्यावसायिक खुलेआम अवैध व्यवसाय चालवित आहेत. या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळाव्यात व स्थानिक नागरिक तसेच युवकांना व्यसनाधिन होण्यापासून वाचवावे, अशी मागणी बाभळेश्वर परिसरातील नागरिकांमधून होत आहे.