दिल्ली | Delhi
बाबरी मशीद विध्वंस (babari masjid) प्रकरणाचा निकाल आज (बुधवारी) लखनऊ येथील विशेष सीबीआय न्यायालयने दिला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व ३२ आरोपी आहेत. त्यातील २६ आरोपी न्यायालयात हजर होते. ६ आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर झाले. या प्रकरणात सर्व ३२ आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. ही घटना पुर्वनियोजित नव्हती, असे न्यायालयाने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार बाबरी पाडणं हा पूर्वनियोजित कट नव्हता मग त्या दिवशी काय काळी जादू झाली होती का?, असा सवाल असदुद्दीन औवेसी यांनी केला आहे.
न्यायालयाच्या याच निकालावर संतप्त प्रतिक्रिया देत एमआयएमचे खासदार अससुद्दीन ओवेसी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. एका पत्रकार परिदषेच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ओवेसी यांनी या निकालाचा निषेध केला. हा निकाल म्हणजे भारतीय इतिहासातील काळा दिवस, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेंबरला जो निर्णय़ दिला होता, त्यात नियमांचं उल्लंघन करत सार्वजनिक धार्मिक स्थळाची संघटीत प्रयत्नांनी नासधूस करण्यात आली होती असं स्पष्ट म्हणण्यात आल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. शिवाय आता सर्वोच्च न्यायालयच असं म्हणत असताना आज त्याविरोधातील निर्णय येणं ही बाब निराशाजनक असल्याचं स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडलं. मशिद काय जादूनं पडली होती का, असा सवाल त्यांनी केला. एक भारतीय मुस्लिम म्हणून आज माझा अपमान झाल्यासारखं वाटत आहे. १९९२ मध्येही असंच काहीसं वाटलं होतं, असं म्हणत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं या निर्णयाला आवाहन द्यावं अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणामुळंच भाजप आज सत्तेत आहे, असा गंभीर आरोपही ओवेसी यांनी केला.
लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल – प्रकाश आंबेडकर
आज आलेल्या निकालांमध्ये सर्वाना निर्दोष सोडून देण्यात आलं. न्यायालय असे निकाल देत राहिले तर हे देशहिताचे नाही. लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाईल, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे. तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
बाबरी मशीद खटल्याचा निकाल वस्तुस्थितीला धरून नाही – माजी खा. हुसेन दलवाई
कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना माजी खा. हुसेन दलवाई यांनी म्हंटले की, “बाबरी मशीद पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराकडून राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात आली. रथयात्रा काढण्यात आल्या, दंगली घडविल्या यात हजारो निष्षापांचा बळी गेला. १५ लाख लोक अयोध्येला जमा झाले होते. ते कोणाच्या नेतृत्वाखाली तिथे आले होते? इतकेच नव्हे तर अनेक जण मशिद तोडण्यासाठी लागणारी अवजारेसुद्धा घेऊन गेले होते. याचे पुराव्यासह वृत्तांकन वृत्तपत्रांमधून व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाने पाहिले आहे. तरीही या कटात सहभागी आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता होते हे अत्यंत धक्कादायक व अनाकलनीय आहे. या निर्णयानंतर काही लोकं मिठाई वाटून आनंद व्यक्त करत आहेत. एकमेकांचे अभिनंदन करत आहेत शुभेच्छा देत आहेत हे पाहून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर काही विशिष्ठ लोकांना अशाच प्रकारे आनंद व्यक्त करून पेढे वाटले होते याची आठवण येते” असे दलवाई म्हणाले.