गोंदिया | Gondia
राज्याचे राजकारण गेल्या दीड वर्षांपासून ढवळून निघालेले आहे. आधी शिवसेनेतून फुटून काही आमदार भाजपसोबत जावून मिळाले आणि महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आले. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आणि अजित पवारांचा गटही सत्तेत सहभागी झाला. याच दरम्यान अजित पवार आणि शरद पवारांची पुण्यात गुप्त बैठकही झाली. याबाबत अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर शरद पवार यांना भाजपने केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिल्याचेही म्हटले. दुसरीकडे अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या. याबाबत आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देतांना मोठं विधान केलं आहे.
कोपरगावमध्ये आ.काळे-कोल्हेंमध्ये जोरदार राडा, पोलिसांचा लाठीचार्ज
आमदार बच्चू कडू गोंदियात प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी भूमिका मांडली. आमदार कडू म्हणाले, “शरद पवार भाजपबरोबर गेले, तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचं वाटोळं होईल. पण, एकनाथ शिंदेंच्या कामात कुणी आडवं येऊ नये”, असं विधान त्यांनी केलं.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सर्व मंत्र्यांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये डीनरसाठी सहकुटुंब बोलावले, मात्र मंत्रिपदाचा दर्जा असूनही बच्चू कडू यांना मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरून नाराज झालेल्या आमदार कडू यांनी जाहीररीत्या आपली नाराजी प्रकट केली आहे. “मुख्यमंत्र्यांनी केवळ कॅबिनेट मंत्र्यांना डीनरसाठी बोलावले आहे. मी कॅबिनेट मंत्री नसल्याने मला बोलावले नसेल,” असे बच्चू कडू म्हणाले. मंत्रिपदाचा दर्जा असल्याचे यावेळी माध्यमांनी कडू यांना विचारले असता मंत्रिपदाचा दर्जा असणे आणि मंत्री असणे यात जमीन-अस्मानचा फरक आहे, असे कडू म्हणाले. आता मंत्रिपदाची ऑफर आली तर मी अजिबात स्वीकारणार नाही, पक्षातील माझे सहकारी राजकुमार बडोले यांना संधी देईन, असे कडू म्हणाले. यापुढे आपण दिव्यांग आणि शहीदांच्या कुटुंबीयांसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Nawab Malik : शरद पवार की अजित पवार गट? नवाब मलिकांचा पाठिंबा कोणाला? समोर आली मोठी अपडेट