अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषद आणि जिल्हा उमेद अभियान यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये बचत गटांचे मोठे नेटवर्क तयार झाले आहे. जिल्ह्यामध्ये 27 हजार 324 महिला बचत गट तयार झालेले असून या गटांमध्ये 3 लाखांपेक्षा अधिक महिला सहभागी झालेल्या आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचे संघटन तयार झाले आहे. या बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात बँकांचे कर्ज उपलब्ध होत आहे. दरम्यान, या महिला बचत गटांना हक्काचे कार्यालय मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील 755 बचत गटांना हक्काचे कार्यालय उपलब्ध झाले आहे.
जिल्ह्यातील महिला बचत गटांना उमेद अभियानाच्या माध्यमातून खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी, जोखीम प्रवणता निधी असे निधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उमेद अभियानाच्या माध्यमातून गावामध्ये सर्व महिला बचत गटांचा मिळून एक ग्रामसंघ तयार करण्यात येतो. या ग्रामसंघांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठीच्या योजना आखण्यासाठी महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळते. भविष्यात ग्रामसंघ हे मिनी बँक म्हणून काम करणार आहेत. या ग्रामसंघाच्या माध्यमातून महिलांना अडचणीच्या काळात सहज कर्ज उपलब्ध होण्यास मदत होईल. जिल्ह्यामध्ये 1 हजार 174 महिला ग्रामसंघ तयार झालेले असून या ग्रामसंघाच्या माध्यमातून महिलांचा ग्रामपंचायतीतील कार्यक्रमांमधील सहभाग उल्लेखनीय पध्दतीने वाढला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सामाजिक जाणीवेतून सुरू केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमांमध्ये महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्याचा ध्यास घेतला आहे. यातूनच महिला बचत गटांच्या ग्रामसंघाला गावात कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाला त्यांच्या पातळीवरून सूचना दिल्या. त्याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यात 755 ग्रामसंघांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्यालय उपलब्ध झाले आहे. अभियानामार्फत देखील या ग्रामसंघांना कार्यालयासाठी स्वतंत्र निधी देण्यात आला असून महिलांना त्यांच्या मासिक बैठकांसाठी हक्काची जागा मिळाली. त्याचबरोबर यातून महिला ग्रामपंचायतीच्या निर्णय प्रक्रियेत पुढे येत असून ग्रामसभेत महिलांचा सहभाग वाढला आहे.
महिलांना हक्काचे ग्रामसंघ कार्यालय मिळाल्याने त्यांच्यामधील आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. गावातील ग्रामपंचायती प्रमाणेच महिला बचत गटांचे देखील गावात कार्यालय झाल्याचा त्यांना मोठा अभिमान वाटतो आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून बचत गटातील विविध उपक्रम अधिक प्रभावीरीत्या पार पाडता येत असल्याने महिला समाधान व्यक्त करत आहेत. भविष्यामध्ये जिल्ह्यामध्ये उर्वरित सर्वच ग्रामसंघांना देखील कार्यालय उपलब्ध करून देण्याबरोबरच जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी बचत गटांचा मॉल तयार करण्यात येणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बचत गटांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद, अहिल्यानगर ही वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. महिला ग्रामसंघाना गाव पातळीवर कार्यालय उपलब्ध झाल्याने अभियानाच्या कामाला गती येईल व महिलांनाही प्रोत्साहन मिळण्यास मदत होत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.
– आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर.