शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
प्रहार पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची लवकरात लवकर दाखल घ्यावी अन्यथा मंत्र्यांच्या गाडी समोर उड्या मारत बलिदान आंदोलन करणार असल्याचा इशारा देत शिर्डीत प्रहार पक्षाचे कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून राष्ट्रीय आणि प्रहार पक्षाचा ध्वज घेऊन प्रचंड घोषणाबाजी केली.
बच्चू कडू यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा गुरुवार पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे. सरकारने अद्यापही त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिर्डीत प्रहार पक्षाच्या वतीने गुरुवारी सकाळी नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या नगरपंचायत पाण्याच्या टाकीवर चढून लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल बाणाईत, युवकचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब काकडे, शहराध्यक्ष विकी मिसाळ, सुरेश गुगळे, नितीन भन्साळी, उपाध्यक्ष भाऊसाहेब दिघोळे आदींसह दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बच्चू कडू यांना न्याय मिळालाच पाहिजे, सरकार झोपा काढू नका, अन्नत्याग आंदोलनावर तातडीने तोडगा काढावा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिर्डी पोलिसांना घटनेची खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरवले. येत्या दोन दिवसात सरकारने शेतकर्यांची कर्जमाफी न केल्यास आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांना भेट द्यावी. असे न झाल्यास आम्ही पालकमंत्रांच्या गाडीखाली जीव देऊ, असा इशारा भाऊसाहेब काकडे यांनी दिला.
हे गेंड्याच्या कातडीचे सरकार असून झोपलेले आहे. यांना शेतकर्यांच्या आत्महत्येशी काही देणे घेणे नाही. या सरकारला जाग येण्यासाठी आम्ही लोकशाही पद्धतीने शिर्डी नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ने आंदोलन केल्याचे तालुकाध्यक्ष अमोल बानाईत यांनी सांगितले. यावेळी प्रहार पक्षाच्या मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदारांना देण्यात आले.




