Wednesday, February 4, 2026
Homeराजकीय“आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला…”; बच्चू कडू यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

“आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला…”; बच्चू कडू यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

बुलढाणा । Buldhana

शेतकरी प्रश्नांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे आयोजित राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सरकारच्या धोरणांवर बोलताना त्यांनी थेट आमदारांना लक्ष्य केले, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शेतकरी आत्महत्यांवर बोलताना बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “सरकार हे डुकरासारखं आहे, डुक्कर परवडलं, पण सरकार नाही.” सरकारवर जोरदार टीका करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष न देणाऱ्या आमदारांना थेट धमकी दिली. “अरे, आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका,” असे अत्यंत खळबळजनक विधान त्यांनी केले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे देखील परिषदेत उपस्थित होते.

YouTube video player

बच्चू कडू यांनी केवळ सरकार आणि आमदारांवर टीका केली नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या लढाईच्या दिशेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे शेतकरी मागे राहिला.” शेतकऱ्यांनी कमी भावात सोयाबीन विकावे लागत असेल, तर त्यांनी बांगड्या भरा काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच, शेतकऱ्यांनी निष्क्रिय न राहता आपला हक्क लढून मिळवावा, असे आवाहन त्यांनी केले. आमदारांवर अधिक टीका करताना बच्चू कडू म्हणाले, “शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही.” शहरांतील आमदार आपले ‘हप्ते वसूल केले की झालं’ या भूमिकेत असतात, असे त्यांचे मत आहे.

शेतकऱ्यांच्या बैलाचे उदाहरण देत ते म्हणाले, “तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा, त्याला लाथ तरी मारता येते.” या उदाहरणातून त्यांनी शेतकऱ्यांमधील निष्क्रियतेवर बोट ठेवले. बच्चू कडू यांनी यावेळी महान नेत्यांच्या संघर्षाची आठवण करून दिली. “बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी तुमच्यासाठी अडीच लाख पगाराची नोकरी सोडून लढले,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना संघर्षातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू नागपुरात सरकारच्या विरोधात आंदोलनाला बसले होते. त्यावेळी सरकारने शिष्टमंडळ पाठवून त्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन थांबले होते. मात्र, आता ऐन दिवाळीत त्यांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका आणि आमदारांना थेट ‘कापून टाकण्याची’ भाषा यामुळे राज्याच्या राजकारणाचे तापमान वाढले आहे. बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेकडून पुढील काळात सरकारविरोधात मोठे लढे उभे केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या या विधानाचा राज्यातील अनेक नेते कठोर शब्दांत समाचार घेण्याची शक्यता आहे. या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Fire News : सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

0
सिन्नर | वार्ताहर | Sinnar तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी (Malegaon MIDC) परिसरातील मोहदरी वन उद्यानाजवळ असलेल्या “विमा ॲरोमॅटिक्स” या कंपनीला आज अचानक भीषण आग (Fire) लागल्याची...