मुंबई | Mumbai
बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये मारला गेला. त्यानंतर घडामोडींना वेग आला आणि मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शाळेच्या संस्थापक आणि सचिवाला कर्जतमधून अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवारी एका गुन्ह्यात जामीन मंजूर केला होता. मात्र, पोलिसांकडून दुसऱ्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली होती. आज दुसऱ्या गुन्ह्यातही त्यांना जामीन मंजुर केल्यामुळे दोघांचीही सुटका झाली आहे. यासोबतच शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवलेंनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील संबंधित शाळेचे संचालक तुषार आपटे, उदय कोतवाल यांना एसआयटी टीमने दुपारी कल्याण न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर आज कोर्टाने या दोघांना जामीन मंजूर केला आहे. काल एका गुन्ह्यात जामीन झाला होता. तर दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीने तत्काळ दोघांचा ताबा घेतला होता. मात्र, आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांसह, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनादेखील २५ हजारांच्या जात मुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, याप्रकरणी तिन्ही आरोपींची आज कायदेशीर सुटका झाली आहे. याप्ररणी दाखल दोन्ही गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
महिनाभरापासून फरार असलेल्या शाळेच्या संचालकांना अटक करण्याच्या दिरंगाईवरून कोर्टाने पोलीस आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. दोघेही कर्जतमध्ये लपून बसले होते. दोघे नेरळच्या दामत गावातील फार्म हाऊसवर होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेलाय. त्यानंतर शाळेच्या संचालकांवर कारवाई कधी होणार, याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा