Tuesday, December 10, 2024
Homeशब्दगंधसंत बहिणाबाई

संत बहिणाबाई

– सुरेखा बोऱ्हाडे

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

- Advertisement -

मराठी संत साहित्य परंपरेत आपल्या गुरुभक्तीमुळे आणि अमोघ काव्य प्रतिभेमुळे संत कवयित्री बहिणाबाईंचे वरचे स्थान आहे. अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी मिळून 732 कविता त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या कविता भक्तिभावाचा उत्स्फूर्त आविष्कार आहेत. वेदांताचे प्रतिपादनही त्यात आढळते. यावरून त्याकाळात स्त्रियांवर अनेक बंधने असूनही बहिणाबाई यांनी अभ्यासू वृत्तीने आणि स्वतःच्या अनुभवसमृद्धतेने परखडपणे काव्यलेखन केले. गुरुभक्तीत लीन होऊन अतिशय तरल असे काव्य करणार्‍या त्या कवयित्री होत्या. त्यांच्या अभंगांतून संत तुकारामांचे अस्सल दर्शन घडते.

संत कृपा झाली इमारत फळा आली।

ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया।

नामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार।

जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत।

तुका झालासे कळस भजन करा सावकाश।

बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा॥

ही रचना संत बहिणाबाई यांची!

बहिणाबाईंचा जन्म गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, कन्नड तालुक्यातील वेळगंगा नदीच्या काठी देवगाव (रंगार्‍याचे) येथे शके 1551 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आऊजी आणि आईचे नाव जानकी. माता-पित्यांनी तिचा विवाह वयाच्या पाचव्या वर्षी जवळच्या गावातील 30 वर्षांच्या रत्नाकर फाटक या बिजवराशी करून दिला. त्यांना आधीची दोन मुले होती.

संत बहिणाबाईंना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा-कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमत असत. हळूहळू त्यांची संसारावरील आसक्ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, श़िक्षणाचा अभाव होता तरीही त्यांची समाधानी वृत्ती होती. संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ कायम मनात होती. काम करताना अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करत असतानाही हा भक्तिभाव अभंगाच्या रूपाने त्यांच्या मुखातून बाहेर पडे.

त्या जेव्हा कोल्हापूर येथे वास्तव्यास होत्या तेव्हा तेथे ऐकलेल्या जयराम स्वामींच्या कथा कीर्तनाचा संत बहिणाबाईंच्या मनावर खूप प्रभाव पडला.कीर्तनातील संत तुकारामांच्या अभंगांनी त्यांना खूप प्रभावित केले. तेव्हापासून त्या रोज संत तुकारामांचे अभंग म्हणू लागल्या व त्यांनी संत तुकारामांच्या दर्शनाचा ध्यास घेतला. बहिणाबाईंना तुकोबारायांना सद्गुरू करून घेऊन त्यांचा अनुग्रह व आशीर्वाद घ्यावयाचा होता. यासाठी रात्रंदिवस तुकोबांचे अभंग म्हणत. त्या त्यांचे ध्यान करू लागल्या. बहिणाबाईंची तुकाराम महाराजांवर मोठी निष्ठा, श्रद्धा होती. तुकोबारायांनी त्यांना दृष्टांत दिला आणि गुरुपदेश केला. गुरुबोधामुळे बहिणाबाईंचे सारे जीवन बदलून गेले. आपले गुरू तुकाराम महाराजांवरील अढळ श्रद्धेमुळे बहिणाबाईंच्या जवळ जवळ सर्वच अभंगांत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र, अभंग यांचा उल्लेख आहे.

विठु माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ॥

तुका घेतो कडियेवरी। नामा करांगुळी धरी ॥

एकनाथ खांद्यावरी। कबीराचे हाती धरी॥

गोरा कुंभार मांडीवर ।चोखा जिवा बरोबरी॥

आपले गुरू संत तुकाराम महाराज व त्यांची गुरुपरंपरा त्यांनी आपल्या अभंगांत वर्णन केली आहे.

बहिणी म्हणे तुका सद्गुुरु सहोदर

भेटता अपार सुख होय।

तुकाराम महाराजांविषयी प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत, त्यामुळे या अभंगांना विशेष महत्त्व आहे. संत मेळाव्यात बहिणाबाईंच्या भक्तिमय अभंगांच्या निर्मितीमुळे त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत, संतचरित्रकार आणि श्री गजानन विजयकर्ते संतकवी दासगणू महाराज लिहितात, पाहा केवढा अधिकार.. ऋणी तिचा परमेश्वर…

बहिणाबाईंनी आपल्या अभंगांतून वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडलेले आहे. गुरुपरंपरेवर अभंग, आत्मनिवेदनपर अभंग, निर्वाणपर अभंग, भक्तीपर अभंग अशा अनेक प्रकारच्या अभंगांची रचना त्यांनी केली आहे. स्वतःशी बोलण्याबरोबरच समाजालाही मार्गदर्शनपर असे त्यांचे अभंग आहेत. संत बहिणाबाईंनी पदे, गौळणी, भारुडे यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले.

त्यांनी आपल्या 13 गत जन्मांची हकीगत आपल्या मुलाला सांगितली. बहिणाबाई शिकलेल्या होत्या. लोक त्यांना मान देत असत. परंतु त्यांना कसलाही अहंकार नव्हता.

वयाच्या 74 व्या वर्षी ‘संत कृपा झाली। इमारत फळा आली ॥’ हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि ‘घट फुटलियावरी। नभ नभाचे अंतरी॥’ हा शेवटचा अभंग सांगून त्या समाधिस्थ झाल्या. या साध्वीची समाधी शिऊर या गावी आहे.

त्यांचे अभंग 17 व्या शतकातील, पण ते प्रसिद्ध झाले विसाव्या शतकात. त्यांची काव्यशैली साधी सरळ आणि हृदयस्पर्शी आहे. बहिणाबाईंची विठ्ठलाच्या चरणी बुद्धी एकाग्र झाल्यावर बुद्धीपलीकडे असलेल्या प्रज्ञाच्या प्रदेशात त्या सहज पोहोचल्या. गीतेचे तत्त्वज्ञान त्यांनी सहज सोप्या शब्दांत ठिकठिकाणी आपल्या अभंगात उलगडून सांगितलेले आहे.

सूर्याची अंगी भासले मृगजळ

सूर्य तो केवळ नेणे तया

तैसी जाण माया ब्रम्हाची आभासे

नसे ब्रह्मतवासी त्यांचा।

त्यांचे आत्मज्ञान वाढत गेले.

विठ्ठल भक्तीतून अध्यात्म ज्ञानापर्यंत पोहोचलेल्या त्या श्रेष्ठ कवयित्री होत्या. स्री संतपरंपरेत त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांच्या रचना तरल आणि मधूर भाषेत आहेत. त्यांच्या प्रासादिक, साध्या, सोप्या अभंग रचना आजही लोकमनास नवी दिशा देतात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या