देवळाली प्रवरा (वार्ताहर)
यंदा सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असल्याने यंदाचा बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला असला तरी पोळ्याच्या दिवशी पाऊस न आल्याने यंदाचा पोळा कोरडाच गेला. या पोळ्याला उत्साहाबरोबरच निराशा व वाढलेली प्रचंड महागाईची किनार दिसून आली.
बारा महिने शेतात राबराब राबल्यानंतर श्रावण अमावस्येला पोळा हा सण बळीराजा दरवर्षी साजरा करतो. ही परंपरा वर्षानुवर्ष सुरु आहे. परंतु अलिकडे आधुनिक शेतीसाठी बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली. तशी बैलांची संख्या कमी-कमी होत गेली. आता तर अत्यंत नगण्य अशी झालेली दिसत आहे.
बैल आपल्या दारात हवा ही धारणा शेतकर्यांची असल्याने अनेकजण हौसेखातर बैल सांभाळताना दिसताहेत. परंतु आकाशाला भिडलेल्या महागाईतून व जीएसटीच्या तडाख्यातून पोळा देखील सुटला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बैल पोळ्याला लागणार्या वस्तूंमध्ये तीस ते चाळीस टक्के वाढ झाल्याने अनेकांनी साध्या पध्दतीने पोळा साजरा करणे पसंत केले.
त्यातच दरवर्षी पोळ्याला हमखास पाऊस येत असतो व खरीप पिकांना बंधा रुपया जिवदान मिळते. सध्या सोयाबीन, कपाशी आदी पिके पाण्यावर आली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या पिकांना पाण्याची गरज आहे. बागायती भागात शेतकर्यांनी पिकांना पाणी देणे सुरू केले आहे. मात्र, घाटमाथ्यावरील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे या पोळ्याला महागाईबरोबरच पावसाने पाठ फिरविल्याने निराशेची किनार पाहायला मिळाली.