Monday, June 24, 2024
Homeनगरपोळा सणावर लम्पीचे सावट !

पोळा सणावर लम्पीचे सावट !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाच्या संसर्गामुळे जनावरांच्या मिरवणूक, यात्रा, बाजार आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. येत्या गुरूवारी (दि.14) जनावरांचा पोळा सण येत आहे. या दिवशी शेतकरी, पशुपालक आपल्या बैलांची सजवून गावोगावी वाजत गाजत मिरवणूक काढत असतात. मात्र, यंदा लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावामुळे जनावरांच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आलेली असल्याने यंदाच्या पोळा सणावर लम्पीचे सावट राहणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना आपल्या बळीराजाची घरीच पूजा करावी लागणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या 520 गावात लम्पी बाधित जनावरे आहेत. या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानूसार विविध निर्बंध सुरू आहेत. तर दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात 3 हजार 424 जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. यातील 2 हजार 256 जनावरांनी लम्पी रोगावर मात केली असून 201 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. सध्या 967 लम्पी ऑक्टिव केसेस असल्याचे पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात लम्पीमुळे मृत्यूमुखी पडणार्‍या जनावरांचा सरासरी मृत्यूदर हा 2.30 टक्के असून बाधित जनावरांचा सरासरी दर हा 5.87 टक्के आहे.

जिल्ह्यात एप्रिल 2023 पासून हळहळू लम्पी बाधित जनावरांचा आकडा वाढत आहे. लम्पीला रोखण्यासाठी पशूसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांकडून युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात येत असल्या तरी ढगाळ वातावरण, वाढलेल्या डासांचा प्रादुर्भाव यामुळे लसीकरण झालेल्या जनावरांमध्ये लम्पीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी 21 ऑगस्टला आदेश काढत जिल्हा लम्पीग्रस्त जिल्हा म्हणून घोषित केलेले आहे. यात जनावरांचे बाजार, वाहतुक, जनावरे एकत्र आणणे, त्यांची मिरवणूक यावर बंदी यासह अन्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यातच गुरुवारी (दि.14) बळीराजाचा सण असणारा पोळा आहे. या सणावर लम्पीचे सावट आहे. या दिवशी शेतकरी, पशूपालक आपल्या गायी, बैलांना आंघोळ घालून, सजवून त्यांची गावोगावी मिरवणूक काढत असतात. यंदा जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे जनावरांची मिरवणूक काढता येणार नाही. यामुळे यंदा शेतकर्‍यांना आपल्या पशूधनाची घरी पुजा करावी लागणार आहे.

दुष्काळात लम्पीचा तेरावा महिना….!

आधीच दुष्काळ यामुळे बाजारपेठेवर पोळा सणाच्या तोंडावर सावट आहे. खरीप हंगामातील 50 ते 90 टक्के पिके पाण्याअभावी वाया गेलेली आहे. पावसाळ्यातील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटलेला असून जिल्ह्यात अद्याप सर्वदूर पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्हा, तालुक्यासह प्रमुख गावातील बाजारपेठा थंड आहेत. पोळा सणासाठी बैलाच्या सावटीचे साहित्य, रंग, बेगड, गोंडे, शिंगदोरी, वेसन, कासरा, वेगवगळ्या आकारातील घुंगरे यासह दुकाने सजलेली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने शेतकर्‍यांनी खरेदीसाठी बाजारपेठेकडे पाठ फिरवलेली आहे. त्यातच आता लम्पीमुळे पोळ्याच्या दिवशी जनावरांची (विशेष करून बैलीची) मिरवणूक काढता येणार नसल्याने शेतकर्‍यांची अडचणी होणार आहे.

या गावात लम्पी बाधित

अकोले 5, जामखेड 18, कर्जत 15, कोपरगाव 39, नगर 51, नेवासा 80, पारनेर 23, पाथर्डी 56, राहाता 15, राहुरी 48, संगमनेर 4, शेवगाव 88, श्रीगोंदा 54, श्रीरामपूर 24 असे 520 गावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या