नेवासा |प्रतिनिधी| Newasa
मोठ्या शक्तींसमोर लढा देत आहे. पण पक्ष आणि पालकमंत्री विखे यांनी माझ्यावर अन्याय केला. ज्यांना भाजपने उमेदवारी दिली, ते खरंच विजयी होऊ शकतात का? माझ्या विरोधात मोठे राजकारण झाले. सर्वांनीच विश्वासघात केला. मात्र प्रहार आणि बच्चू कडू यांनी मदतीचा हात दिला. गडाख यांचे तालुक्यात काम नाही, असा हल्लाबोल करत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मतदारांना सेटलमेंटचे राजकारण कदापि करणार नाही, असा दावा केला आहे.
नेवासा मतदारसंघातील प्रहार पक्षाकडून उमेदवारी करणारे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मेळाव्यातून आपले पूर्वाश्रमीचे नेते आणि सहकार्यांवर टीका केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांच्या उपस्थितीत त्यांच्यासाठी मेळावा झाला. मुरकुटे म्हणाले, नेवासा तालुक्यातील जनता तनमनधनाने माझ्यासोबत आहे. मतदारसंघातून माझ्यासाठी उमेदवारी मागण्यासाठी विठ्ठल लंघे हे माझ्यासोबत होते. मात्र, त्यांनी विश्वासघात केला आणि स्वत:ची उमेदवारी मिळवली. कायम दुसर्याचा टेकू घेऊन राजकारण करणार्या लंघे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि शिंदे यांची शिवसेना असा प्रवास केला आहे. शेजारी घुले यांच्या कारखान्यात ते संचालक म्हणून निवडून येऊ शकत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
अन्यायाचा वचपा काढण्यासाठी आता गावागावातील कार्यकर्ते सज्ज झाले असून त्यांनीच याचा वचपा काढावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. राजकारण करताना यापुढच्या काळात अर्धी भाकरी मला मिळाली तर त्यातील चतकोर तुम्हाला देईल, पण तुम्हाला उपाशी राहू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तालुक्यात विरोध जिवंत ठेवण्यासाठी माझी उमेदवारी असून कोणतीही सेटलमेंट कदापी करणार नाही. तालुक्यातील जनतेसाठी जिवात जीव असेपर्यंत लढणार असेही त्यांनी सांगितले. मतलबी राजकारण करणारे लंघे हे कायम गडाख-घुले यांच्याशी हात मिळवणी करत आले असल्याचा आरोप त्यांनी केला. वीस वर्षे ज्ञानेश्वर कारखान्यात संचालक म्हणून लंघे यांना घुले यांनीच संधी दिली. त्यातच सारे काही समजून घ्या, असेही मुरकुटे यांनी म्हटले आहे.
माणूस एकाचा, उमेदवारी दुसर्याची
मी आतापर्यंत दोन तोंडाचा साप पाहिलेला आहे, त्यासारखीच अवस्था आता राजकारणात झालेली आहे. नेवाशात माणूस एका पक्षाचा आणि उमेदवारी दुसर्या पक्षाची अशी अवस्था दिसत आहे. त्यामुळे आता माजी आमदार मुरकुटे मैदानात आहेत. नेवाशाचे पालकत्वही मी स्विकारण्यास तयार आहे. तुम्ही मात्र जोरदारपणे लढा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना केले.
गडाख व लंघे एकाच माळेचे मणी
तालुक्यात एका बाजूला दडपशाही चालू असून दुसर्या बाजूला सतत अंधारात राजकारण केले जात आहे. जर गडाख यांच्या विरुद्ध लढायचे होते तर घुले यांच्या कारखान्यात ते अजूनही संचालक का आहेत? कारखान्यातून कुणाच्या गाडीला डिझेल जाते? तुमची उमेदवारी ही कुणाच्या आशीर्वादाने झाली? ज्यांनी लाल दिवा दिला त्यांचे हे झाले नाही, असे आरोपही मेळाव्यातून झाले.