Tuesday, October 22, 2024
Homeनगरनेवाशात महायुतीत बंडाळीची चिन्हे!

नेवाशात महायुतीत बंडाळीची चिन्हे!

सेनेकडून शिंदेंना उमेदवारीचे संकेत || माजी आमदार मुरकुटे अजितदादांच्या भेटीला

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होण्यास सुरूवात होताच मतदारसंघातील राजकारणाने वेग घेतला आहे. विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर विरोधात प्रबळ दावेदार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे प्रभाकर शिंदे यांचे नाव घेतले जात आहे. त्यांच्या उमेदवारीची चर्चा असताना अचानक भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची भेट घेतल्याचे पेव फुटले आहे. त्यावरून मतदारसंघात महायुतीतच बंडाळी होते की काय, अशा शक्यतेने जोर धरला आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास दोन दिवसांत सुरूवात होत आहे. महाविकास आघाडीकडून मतदारसंघात विद्यमान आमदार शंकरराव गडाख शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानात आहेत. त्यांनी भेटीगाठीचा झंझावात सुरू ठेवला आहे. त्यांना कोण लढत देणार, याची उत्सुकता मतदारसंघात शिगेला पोहचली आहे. महायुतीतून या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकला आहे. मतदारसंघात याआधी राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षातून आमदार होते. त्यामुळे या पक्षांकडूनही मतदारसंघावर दावा सांगितला जातो. मात्र उद्योगपती प्रभाकर शिंदे मतदारसंघात सक्रीय झाल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.

शिंदे सेनेकडून ते उमेदवारी करतील, असा दावा केला जात आहे. ही चर्चा असताना रविवारी समाज माध्यमांवर भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीचे छायाचित्र व्हायरल झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना सुरूवात झाली आहे. यावरून मतदारसंघात महायुतीत बंडाळी होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. प्रभाकर शिंदे यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आल्याने या भेटीबाबत विविध तर्क काढले जात आहेत. माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चाही काहींनी उडवून दिली आहे. सेनेकडून चर्चा असलेला उमेदवार नवखा आहे, त्यांचा जनतेशी संपर्क नाही, असा दावा करत ही जागा राष्ट्रवादी किंवा भाजपनेच लढवावी, असा आग्रह मुंबईत वरिष्ठांकडे धरला गेल्याचे समजते. या घडामोडींमुळे मतदारसंघात महायुतीत बंड होणार, या शक्यतेने जोर धरला आहे. दरम्यान, अनेक इच्छुकांनी मुंबईत ठाण मांडले असून दोन दिवसांत मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.

सेना की राष्ट्रवादी ?
भाजपने जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले. त्यात नेवासा मतदारसंघाचा समावेश नाही. त्यामुळे ही जागा महायुतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडे जाणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे, हा प्रश्न चर्चेत आला आहे. गडाखांविरोधात जवळपास 7 ते 8 जणांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यातील किती जण मैदानात उतरणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या