Friday, October 23, 2026
HomeनगरSangamner : सरकारने दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना मदत करावी

Sangamner : सरकारने दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना मदत करावी

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची मागणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके वाया गेली, विजेचा मोठा खेळखंडोबा झाला असून तालुक्याचे हक्काचे पाणी पळवले जात आहे. या विरोधात संगमनेर तालुक्यातील असंख्य शेतकरी, नागरिक, युवक व महिला यांनी मंगळवारी (दि.22) रस्त्यावर उतरून सरकार व प्रशासन विरोधात महाआक्रोश मोर्चा काढला. सरकारने महाराष्ट्रात त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकरी व शेतमजुरांना मोठी मदत करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. जर सरकार जागे झाले नाही तर जागा सोडावी लागेल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

- Advertisement -

संगमनेरमध्ये शेतकरी व नागरिक यांच्या वतीने दुष्काळ जाहीर करावा, तातडीने मदत मिळावी, तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे, पूर्ण दाबाने वीजपुरवठा व्हावा, आवर्तन काळात नदीकाठी हक्काची 11 तास वीज उपलब्ध असावी यासाठी शेतकर्‍यांचा आक्रोश मोर्चा झाला. यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत झालेल्या या मोर्चामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, अ‍ॅड. माधव कानवडे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर, जळालेली पिके घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. याप्रसंगी सरकारच्या व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि संतप्त झाल्यानंतर थेट प्रांताधिकारी कार्यालयात घुसले.

बसस्थानकासमोर मोर्चात बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले की, संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून पिके जळाली आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र तरीही सरकार जागे व्हायला तयार नाही. सरकार जागे झाले नाही तर शेतकरी त्यांना जागा सोडायला लावेल. खोट्या बातम्या द्यायच्या, आशेला लावायचे हे काम सरकार करत आहे. दुसर्‍या विषयाकडे जनतेचे लक्ष वळवून दिशाभूल करायची असा उद्योग सुरू असून खोट्या बातम्या नको तर प्रत्यक्ष मदत हवी आहे. सर्वत्र पिके वाया गेली आहे.

पंचनामे कसले करता, राज्यात पाऊस नाही, त्यामुळे सर्वांना मदत करा. यावर्षी 1972 पेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसावर आधारित संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे. मात्र सरकार बातम्यांच्या बाहेर पडायला तयार नाही. बातम्या नको ठोस मदत करा.नवीन माणसांना पाण्याची लढाई माहित नाही. हक्काच्या 30 टक्के पाण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय मधुकर पिचड आणि आम्ही लढलो म्हणून पाणी मिळाले. त्यावेळी पूर्वीचे पाट रुंद केल्यामुळे पुन्हा पाणी पूर्वेकडे वाहून जात होते. त्यावर न्यायालयीन लढाई करून आवर्तन काळामध्ये 11 तास हक्काची वीज मंजूर करून घेतली.

निळवंडे धरण व पाटासाठी रक्ताचे पाणी करून ते पूर्ण केले. प्रत्येकाचे पुनर्वसन केले निधी आणला. तालुक्यातील साडेबासष्ट हजार एकर शेती या पाण्याखाली येणार आहे. हे या शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी आहे. दोन्ही कालव्यांना काँक्रिटीकरण केल्याने पाणी पुढे जात आहे. हक्काचे पाणी उचलता येत नाही आणि उचलले तर तीन लाखापर्यंत ग्रामपंचायतींना बिल आले आहे. वीज जाते म्हणजे फक्त वीज जात नाही तर पाणी पुढे जाते. पाणी पुढे गेले तर संपूर्ण जीवन आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल म्हणून वेळीच जागे व्हा असे सांगताना सरकारने शेतकर्‍याच्या शेतावर काम करणार्‍या शेतमजुराचा सुद्धा विचार केला पाहिजे. आता कोणतीही दिरंगाई न करता दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मोठी मदत करा, अशी मागणी त्यांनी केली. शेवटी प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर आदी उपस्थित होते.

आमदारांवर केली कठोर टीका…
फ्लेक्सच्या पुढे त्यांचे राजकारण नाही. कधी एक वाक्य पाण्यावर बोलत नाही. गावोगावी 2000 फ्लेक्स लावले आहेत. फ्लेक्सला पैसे आले कुठून माहीत नाही. फ्लेक्स लावून पोट भरणार नाही. फ्लेक्सचे पैसे गरीबांसाठी खर्च करा. या फ्लेक्सबाज वृत्तीचा तालुका निषेध करत असून तालुक्यातील नागरिकांचे काम पाहिजे. त्यामुळे अशा निष्क्रिय माणसाची जास्त चर्चा करू नये असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता विद्यमान आमदारांना लगावला. तसेच प्रशासन आणि प्रांताधिकारी हे कुणाच्या तरी राजकीय दबावाखाली काम करत आहेत, असे खडे बोल प्रशासनाला सुनावले. त्यावर प्रांताधिकारी अरुण उंडे म्हणाले की, नियोजित कार्यक्रम होता. मात्र, माजी मंत्री थोरात हे मोर्चामध्ये आहे हे समजल्यानंतर मी तातडीने आलो आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. सहकाराच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व टिकविण्याची धडपड, नेत्यांमधील मतभेद आणि पडद्यामागील...