नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसंदिवस गंभीर होत आहे. आता पाकिस्तानमधील बलोच आर्मीने संपूर्ण ट्रेनच हायजॅक केली. दशतवाद्यांनी रेल्वेतील १२० जणांना ओलीस ठेवले आहे. त्यात आयएसआय आणि पाकिस्तानी लष्काराचे कर्मचारी आहेत. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात रेल्वे चालक जखमी झाला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जाफर एक्सप्रेस नावाची ही रेल्वे बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तुनख्वा येथील पेशावर येथे जात होती. याच्या नऊ डब्यांमध्ये सुमारे ४०० प्रवाशी होते.
बलूच लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी संघटनेने एका निवेदनात या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह रेल्वेतील प्रवाशांना ओलीस ठेवले असल्याचे म्हटले आहे. पण, हल्लेखोरांनी प्रवाशांना ओलीस ठेवल्याच्या दावाची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
रेल्वे नियंत्रक मुहम्मद काशिफ यांनी म्हटले आहे की, नऊ डब्यांचा समावेश असलेल्या या ट्रेनमध्ये सुमारे ४०० प्रवासी होते. बोगदा क्रमांक ८ मध्ये सशस्त्र लोकांनी ट्रेन थांबवली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ही घटना संभाव्य दहशतवादी घटना असू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) चे कर्मचारी आहेत. हे सर्वजण रजेवर पंजाबला जात होते. ट्रेनमध्ये उपस्थित सैनिकांनी कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व ओलीस ठार केले जातील, असा इशारा बीएलएने दिला आहे.
फुटीरतावादी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी दावा केला की, त्यांनी जाफर एक्सप्रेसने प्रवास करणार्या महिला, मुले आणि बलुचिस्तान प्रवाशांना सोडले आहे, जेणेकरून उर्वरित सर्व ओलीस पाकिस्तानी सैन्याचे कर्मचारी आहेत याची खात्री होईल.
बलुचिस्तानमधील फुटीरतावादी संघटना अनेक दिवसांपासून पाकिस्तानविरोधात लढा देत आहेत. हा भाग अतिरेकी कारवायांचे केंद्र बनला आहे, जिथे पाकिस्तान सरकारवर सातत्याने हल्ले होत आहेत. काही दिवसांपूर्वी बलुच गटांनी पाकिस्तान आणि चीनविरोधात नव्याने हल्ला करण्याची घोषणा केली होती. बलुच गटाने अलीकडेच सिंधी फुटीरतावादी गटांसोबत युद्ध सराव पूर्ण केला होता.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा