Friday, May 24, 2024
Homeनगरबंदी असलेल्या किटकनाशकांचा साडेसहा लाखांचा साठा जप्त

बंदी असलेल्या किटकनाशकांचा साडेसहा लाखांचा साठा जप्त

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव शहरा नजीक वडुले येथे एका शेताच्या गोदामामध्ये बंदी असलेल्या कीटकनाशकांचा साठा कृषी विभागाच्या अधिकार्‍यांच्या पथकाने छापा टाकून हस्तगत केला असून या छाप्यात सुमारे सहा लाख 48 हजार रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा जप्त करून ते गोडाऊन सील करण्यात आले आहे. तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रशांत उर्फ बंटी दिलीप म्हस्के (रा. शेवगाव) असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या कृषी विभागातून सांगण्यात आली. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वडुले नजीक येथे एका शेताच्या गोडाऊनमध्ये बंदी असलेल्या कीटकनाशकांचा साठा करून ठेवल्याची माहिती गुप्त खबर्‍याकडून मिळाली होती. त्यानंतर त्या जागेची तपासणी करण्याकरिता पुणे येथील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी आर. बी. ढगे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल कदम, कृषी विस्तार अधिकारी फाजगे यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.

तेथील जागेत कीटकनाशके कायदे अन्वये बंदी घातलेल्या नुवान व फोरेट या औषधांचा अनधिकृतपणे केलेला मोठा साठा आढळून आला. याबाबत संबंधिताकडे कीटकनाशक विक्री परवाना तसेच शासनाच्या परवानगीचे कोणतेही कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे सदरील जागेवर सापडलेल्या सर्व औषधांचा पंचनामा करून सुमारे 6 लाख 48 हजार रुपये किमतीची औषधांचा साठा जप्त करून ते गोडाऊन सील करण्यात आले आहे. याबाबत पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल विजय कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी प्रशांत उर्फ बंटी दिलीप म्हस्के यांच्याविरुद्ध कीटकनाशके नियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या विविध कलमानुसार तसेच भारतीय दंड विधान कलम 420 प्रमाणाचे उल्लंघन केल्याने रीतसर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून सांगण्यात आली.

नुआन व फोरेट या किटकनाशकांचे मोठे दुष्परिणाम असल्याने त्यांवर बंदी आहे. या किटकनाशकांमुळे शेतकर्‍यास उपायोगी ठरणारे गांडूळ तसेच इतर कृमीही नष्ट होत आहेत. तसेच किटक नाशक पडले त्याच्या अजुबाजुला 4 मिटरपर्यंत माती विषारी होते. तसेच जवळील पाण्याचे स्त्रोतही दुषीत होत असल्याने यावर बंदी आहे.

राहुल कदम, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती शेवगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या