Thursday, May 23, 2024
Homeनाशिकपीओपी मूर्तींवर बंदी

पीओपी मूर्तींवर बंदी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती विक्री व आयातीचा साठा करण्यात येऊ नये, यादृष्टीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

- Advertisement -

उच्च न्यायालयाने नद्यांचे प्रदूषण टाळणसाठी पीओपीच्या मूर्तींवर विक्री व साठा करण्यास यापूर्वीच बंदी घातलेली आहे. उच्च न्यायालयाचे निर्देश तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार मूर्ती विक्रेते व साठा करणार्‍यांनी पालन करावे, असे आवाहन डॉ. अशोक करंजकर यांनी केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

येत्या 19 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी गणेश मूर्ती विक्री करणार्‍यां स्टॉलधारकांनी महानगरपालिकेची परवानगी घ्यावी. ही परवानगी घेताना संबंधीत स्टॉलधारकांकडून प्लॅस्टर ऑफ पॅरीसची गणेश मूर्ती विक्री न करण्याबाबतचे हमीपत्र घेतले जाणार आहे. तसेच डोंगरे वसतिगृह, ठक्कर डोम, गोल्फ क्लब मैदान येथे मोठ्या प्रमाणावर काही खासगी लोक स्टॉल उभारले जातात. यामुळे संबंधीत स्टॉल उभारणार्या खासगी संस्था व व्यक्तींना देखील याबाबतची सूचना केली जाणार आहे. गोदावरी नदी व इतर चार उपनद्यांमध्ये प्रदूषण निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून, शहरासह उपनगरांमध्ये कृत्रिम तलाव उभारले जाणार आहेत.

गेल्या वर्षी 249 ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते. विक्रेत्यांनी शाडूमातीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्यात तसेच भाविकांनी देखील शाडूच्याच मूर्ती घेण्यास प्राधान्य द्यावे. तसेच गणेश मूर्तीसाठी पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

महापालिकेच्या बांधकाम, आरोग्य विभागामार्फत गणेशोत्सव कालावधीत मूर्ती संकलन केले जाते. त्यानुसार यंदा आकर्षक कृत्रिम तलाव व अधिकाधिक गणेश मूर्ती संकलन करणार्या निवडक पथक तसेच कर्मचार्‍यांचा महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

या बैठकीस उपायुक्त पर्यावरण विभाग डॉ. विजयकुमार मुंडे, उपायुक्त कर विभाग श्रीकांत पवार, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, कार्यकारी अभियंता पर्यावरण विभाग राजेंद्र शिंदे, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक प्रशांत ठोके, शंतून नाईक आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या