Friday, May 3, 2024
Homeजळगावआंध्रच्या केळीची खान्देशवर मात

आंध्रच्या केळीची खान्देशवर मात

थंडीचा परिणाम : मार्चमध्ये निर्यात सुरु होण्याची अपेक्षा

रावेर  –

सध्या पडणार्‍या थंडीमुळे खान्देशातील केळी निर्यातीला ब्रेक लागल्याने खान्देशच्या केळीवर आंध्रच्या केळीने मात केली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातील केळी उत्पादकांना सुगीचे दिवस आले आहेत. यंदा थंडीमुळे निर्यात उशिराने म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा केळी उत्पादकांना आहे.

- Advertisement -

रावेर-यावल तालुक्यातील निर्यातक्षम केळीला थंडीमुळे ‘चिलिंग इंज्युरी’ने ग्रासले असल्याने सद्य:स्थितीत अरब राष्ट्रांतील निर्यातीला ब्रेक लागला आहे. निर्यातदार केळी व्यापारी इंज्युरीमुळे खान्देशऐवजी आंध्र प्रदेशात डेरा टाकून आहेत.

खान्देशपेक्षा अधिक भावात केळी खरेदी करून एक्स्पोर्ट होत आहे. या ठिकाणी निर्यातदारांना मजूर मिळवण्यात व भाषेच्या अडचणी येत असल्या तरीही खान्देशपेक्षा आंध्रात तापमान 15 डिग्रीपेक्षा घसरले नसल्याने केळीवर ‘चिलिंग इंज्युरी’चा परिणाम होत नाही.

परिणामी, परिपक्व झालेल्या केळीचा रंग पिवळाधमक राहतो. याउलट खान्देशातील केळीवर ‘चिलिंग इंज्युरी’मुळे परिमाण होऊन रंग वा वाधा फिक्कट पडत असल्याने आंध्र प्रदेशातील केळीसाठी निर्यातीला संधी चालून आली आहे. यामुळे खान्देशमधील केळी उत्पादकांचे अर्थशास्त्र मात्र बिघडले आहे.

साधारणतः मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात थंडी कमी होऊन निसवणीवर आलेल्या केळीवर परिमाण होणार नसल्याने केळी निर्यात सुरू होण्याची अपेक्षा उत्पादकांना आहे. केळी बेल्टमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात थंडीमुळे केळी बागांचे अतोनात नुकसान होत असल्याने केळी उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडते. परिणामी, निर्यातक्षम केळीची निर्यात रखडते. त्यामुळे केळी उत्पादक केळी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून ‘कोल्ड चिलिंग इंज्युरी’वर अभ्यास करत आहेत. यावर अजून इलाज सापडला नाही. मात्र, प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. पोषक तत्त्वे व खते पुरवून थंडीची झळ कमी व्हावी याबाबत शेतकरी प्रयोग करत आहे.

रावेर-यावल तालुक्यात थंडी अधिक व तापमान 10 अंशांपेक्षा जास्त खाली घसरत असल्याने ‘चिलिंग इंज्युरी’चा फटका केळी बागांवर झाल्याने निर्यातीला अजून तीन आठवडे वाट पाहावी लागेल. खान्देशपेक्षा आंध्र प्रदेशात भाव जास्त असूनही थंडीचा इफेक्ट होत नाही. म्हणूनच तेथील केळी निर्यातीला चालना मिळाली आहे

विमा संरक्षण ः तीन दिवसांची अट जाचक

एक दिवस तापमान कमी झाले तरी उत्पादनात घट येत नाही. मात्र, भावात खूप फरक पडतो. त्यामुळे किमान एक दिवस पारा घसरला तरी विमा संरक्षित धोक्यात नुकसान ग्राह्य धरणे आवश्यक आहे. यासाठी तीन दिवसांची अट शिथिल व्हावी व एक दिवसाचा निकष अंतर्भूत करावा, अशी मागणी केळी उत्पादकांची आहे. ही अट शिथील झाल्यास शेतकर्‍यांना त्याचा काहीअंशी लाभ होणार असल्याने या मागणीसाठी बळीराजा आग्रही आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या