न्हावी ता यावल वार्ताहर –
मे महिन्यात केळी बागांना अतिउष्णतेचा मोठा फटका बसत असून त्यामुळे केळीच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट दिसून येत आहे. न्हावी सह परिसरात हजारो हेक्टर केळी पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे. गेल्या पाच-सहा दिवसापासून कमाल तापमान सतत वाढत आहे. काही भागात तर तापमान ४३-४४ अंशापर्यंत पोहोचले आहे.
उष्णतेमुळे लहान व निसवलेल्या किंवा काढणीवर येत असलेल्या केळी बागांमध्ये रोज सहा ते सात तास सिंचन करावे लागत आहे. कारण बागेत ओलावा कायम ठेवणे आवश्यक आहे.केळी घडांना स्कर्टिंग बॅग किंवा कव्हर लावणे किंवा केळीच्या वाळलेल्या पानांचा चुडा करून घड झाकणे अशी प्रयत्नांची पराकाष्टा शेतकऱ्यांना करावी लागत आहे.अति उष्णतेमुळे बागांमध्ये घड दांड्यातून निष्टून जाण्याची समस्या ही वाढली आहे .झाडे मोडून पडण्याचे प्रकारही वाढले आहेत.
केळीचे घट पडणे ,केळीची लांबी (वाधा ) कमी होणे, सतत पाणी सुरू असून सुद्धा जमिनीत ओल टिकून न राहणे, गुणवत्तापूर्वक केळी तयार न होणे, केळी बागांमध्ये उन्हामुळे कोवळी पाने होरपळणे ,झाडांना उष्णतेचा फटका बसणे अशा समस्या निर्माण होत आहे .खाली पडलेली केळी दुसऱ्या दिवशी कमी भावाने विकणे किंवा व्हेपर तयार करणाऱ्या दुकानदारांना विकणे ,तेही कमी किमतीमध्ये.अशा प्रकारे शेतकऱ्यांची द्विधा परिस्थिती झाली असून त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. उष्णतेमुळे केळीचे घड होरपळून काळे पडत आहेत.त्यामुळे ते शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाल्यागत जमा आहे.