मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटाची (Divorce) प्रक्रिया पूर्ण झाली असून वांद्रे कुटुंब न्यायालयाने युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. यावेळी युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघेही वांद्रे कुटुंब न्यायालयात उपस्थित होते.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा २२ डिसेंबर २०२० रोजी लग्नाच्या बेडीत अडकले होते. चहलने ५ फेब्रुवारी रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर वांद्रे कुटुंब न्यायालयाला (Bandra Family Court) आज या प्रकरणात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून चहल आणि धनश्री एकमेकांसोबत राहत नसून त्यांच्या घटस्फोटाचा खटला कौटुंबिक न्यायालयात (Court) सुरू होता. मुंबई उच्च न्यायालयात धनश्री वर्माने सहा महिन्यांच्या कूलिंग ऑफ कालावधीत सूट देण्याची मागणी केली होती. ही याचिका उच्च न्यायालायाने स्वीकारून वांद्रे कुटुंब न्यायालयाला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, धनश्री आणि युझवेंद्र यांच्या मध्यस्थथीने पोटगीच्या (Alimony) अटींवरही अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार धनश्रीला चहलने ४.७५ कोटी रुपये देण्याचे मान्य केले. तर युझवेंद्रने धनश्रीला मान्य केलेल्या रकमेपैकी २.३७ कोटी रुपये आधीच दिले आहेत. त्यानंतर आता पोटगीची उर्वरित रक्कम घटस्फोटाच्या आदेशानंतर देण्यात येणार आहे.