कोपरगाव । तालुका प्रतिनिधी
मुंबईत कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिर्डीत आयोजित शिबिराला उपस्थित राहिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वांद्रे परिसराच्या सुरक्षिततेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिद्दीकी म्हणाले, ज्या वांद्रयात माझा जन्म झाला, जिथे मी बालपण घालवलं, ते वांद्रे आणि सध्याचं वांद्रे यात मोठा फरक आहे. वांद्रे आता तेवढं सुरक्षित राहिलेलं नाही.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर बोलताना झिशान सिद्दीकी यांनी काही महत्त्वाची माहिती दिली. माझं कुटुंब एका दुर्दैवी घटनेतून गेलं आहे. या प्रकरणात मी पोलिसांना माझं स्टेटमेंट दिलं आहे. काही बिल्डरांची नावं मी जबाबात नमूद केली आहेत, ज्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. मात्र, चौकशी होताना दिसत नाही. या संदर्भात मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
महायुती सरकार आल्यानंतर कट्टरतावाद वाढल्याच्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “नितेश राणे सातत्याने हिंदू-मुस्लिम भेद वाढवणारी वक्तव्य करतात. मात्र, त्यांचे वक्तव्य वैयक्तिक आहेत. त्यांच्या पक्षातील इतर नेतेही त्यांचं समर्थन करत नाहीत. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि अशा वक्तव्यांचा आम्ही नेहमी निषेध केला आहे, असे सिद्दीकी म्हणाले.
तसेच, शिर्डीत येऊन खूप छान वाटतंय. मला बोलण्याची संधी मिळाली. महायुतीमध्ये कोण कट्टरतावाद करत असेल तर त्याचं ते व्यक्तिगत मत असेल. त्याला महायुती समर्थन करत नाही. जेव्हा कधी महायुतीची बैठक होईल. त्या बैठकीत मी या कट्टरतावादाची भूमिका मांडेन. महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढण्यास समर्थ आहोत. 227 वॉर्ड आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत, असंही झिशान सिद्दीकी यांनी यावेळी सांगितले.