अबुधाबी । वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळविला.
85 धावांचे विजयी लक्ष्य बंगळुरूने सहज साध्य केले. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुच्या गोलंदाजीपुढे कोलकात्याचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत दाणादाण उडवली. बंगळुरुने विजायासाठीचं आव्हान 14 व्या षटकात पूर्ण केलं.
85 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुच्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. फिंच आणि देवदत पडीकल यांनी पहिल्या बळीसाठी 46 धावांची भागादारी केली. फलंदाजीत निराशाजनक कामगिरी केलेल्या कोलकाता संघाने गोलंदाजीतही फारशी चमक दाखवली नाही. मागच्या सामन्यात गोलंदाजीत चमक दाखवलेल्या लॉकी फर्ग्युसनला पॉवरप्ले नंतर गोलंदाजीची संधी दिली.
फर्ग्युसनने संधी मिळताच फिंचला माघारी धाडत बंगळुरुला पहिला धक्का दिला. देवदत पडीकलही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि गुरकिरत मान यांनी अधिक जोखीम न घेता पडझड होणार नाही याची काळजी घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.तत्पूर्वी मोहम्मद सिराज, ख्रिस मॉरिस, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फॉर्मात असलेल्या गोलंदाजांसमोर अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी संपूर्णपणे हार पत्करल्याचं पहायला मिळालं.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला. सुरुवातीच्या षटकांपासून कोलकाताच्या डावाला लागलेली गळती थांबवण्यात संघाचे फलंदाज अपयशी ठरले. 20 षटकांत संघ अवघ्या 84 धावांपर्यंत मजल मारु शकला.
कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी ही जोडी मैदानावर आली. परंतू बंगळुरुच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांपासूनच भेदक मारा करत दडपण आणलं. मोहम्मद सिराजने िएकाच षटकात राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा यांना माघारी धाडलं. शुबमन गिल देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर माघारी परतला.
मैदानावर फटकेबाजी करु पाहणार्या टॉम बँटनलाही सिराजने माघारी धाडत घघठ समोरची अडचण अधिकच वाढवली. मोहम्मद सिराजने एकाच सामन्यात दोन षटकं निर्धाव टाकून 3 बळी घेत विक्रमाची नोंद केली. फलंदाजीसाठी कर्णधारपद सोडलेला दिनेश कार्तिकही फारशी चमक दाखवू शकला नाही. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर 14 चेंडूत 4 धावा काढत तो माघारी परतला.
चहलनेच पॅट कमिन्सला देवदत पडीकलकरवी झेलबाद करत माघारी धाडलं. कर्णधार मॉर्गन एक बाजू सांभाळून होता परंतू समोरच्या फलंदाजांकडून सपोर्ट मिळत नसल्यामुळे फटकेबाजीच्या प्रयत्नात त्यानेही आपली विकेट फेकली. कुलदीप यादव आणि लॉकी फर्ग्युसन यांनी अखेरच्या षटकांत पडझड रोखत संघाला 84 धावांचा टप्पा गाठून दिला.