नाशिक । Nashik
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतातून सर्वाधिक कांदा ज्या देशात पाठवला जातो, त्या बांगलादेशने कांदा आयातीवर निर्बंध घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेश सरकारने नव्या कांदा आयात परवान्यांवर तात्काळ बंदी घातली असून, आधी मंजूर करण्यात आलेले परवानेही केवळ ३० जानेवारीपर्यंतच वैध राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर कोणतेही नवे परवाने ग्राह्य धरले जाणार नाहीत.
या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत कांदा निर्यात पूर्णपणे थांबण्याची शक्यता असून, त्याचा थेट फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्या-तील शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांमध्ये या घोषणेमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. नाशिक हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक जिल्हा मानला जातो. केवळ नाशिक जिल्ह्यातूनच दररोज सरासरी दीड हजार टन कांदा बांगलादेशला निर्यात केला जातो. बांगलादेश हा भारतीय कांद्याचा सर्वात मोठा बाजार असल्याने या बंदीचा परिणाम कांद्याच्या बाजारभावावर आणि पुरवठा साखळीवर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निर्यात थांबल्यास देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक वाढेल. त्यामुळे कांद्याचे दर घसरण्याची शक्यता असून, आधीच उत्पादन खर्चात वाढ झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. साठवणूक केलेला कांदा बाजारात आणावा की नाही, या संभ्रमात शेतकरी सापडले आहेत.
दरम्यान, कांदा व्यापारी आणि निर्यातदारांनीही सरकारकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. पर्यायी निर्यात बाजार शोधणे, तसेच केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी चर्चा करून या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.




