संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
बांग्लादेशमधील हिंदू धर्मियांचे आध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर तेथील अल्पसंख्यांक असलेला हिंदूधर्मियांवर सातत्याने विविध हल्ले होत असून यामुळे तेथील हिंदूंसह संपूर्ण जगभरातील हिंदूधर्मीय चिंतेत आहेत. तरी आपण तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेबरोबर बांगलादेशमधील हिंदूधर्मियांना संरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की बांगलादेशमधील आध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्णदास यांना तेथील सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांना तुरुंगात टाकले आहे. यामुळे केवळ त्यांच्या अनुयायींना त्रास झाला नाही तर बांगलादेशमधील समस्त हिंदू बांधवांच्या सुरक्षिततेबद्दल आणि कल्याणाबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. एक सहकारी माणूस आणि धार्मिक सहिष्णुता आणि मानवी हक्कांना महत्त्व देणारा राज्याचा नेता या नात्याने आपणास विनंती आहे, की आपण भारत व बांगलादेश सरकारमधील उच्च अधिकार्यांना तातडीने पत्र लिहून व योग्य राजनैतिक हस्तक्षेप करून तेथील हिंदू समाजाला मानवतावादी मदत आणि समर्थन देण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा.
हिंदू धर्माच्या शिकवणीनुसार मानवता हाच धर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. बांगलादेशमध्ये मात्र जाणीवपूर्वक कट्टरतावाद वाढवून राजकारणासाठी हिंदूधर्मियांना त्रास दिला जात आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी धर्मगुरू चिन्मय कृष्णदास यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच तेथे होत असलेल्या हिंदूधर्मीयांचा छळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र आणि देशाच्यावतीने तातडीने पुढाकार घेऊन तेथील हिंदू समाजाला सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण उपाययोजना करून दिलासा द्यावा, अशी विनंती केली आहे.