नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कानपूरच्या ग्रीन पार्कवर हा सामना सुरु झाला आहे. या सामन्यासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. बांगलादेशात झालेल्या हिंदूंवरील अत्याचारामुळे भारतीयांमध्ये राग आहे. यामुळे बांगलादेशविरोधात भारतीय संघाचे सामने खेळले जाऊ नये, अशी मागणी केली जात आहे. याचदरम्यान, कानपूरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचा सुपरफॅन असलेल्या रॉबीला स्टेडियममध्येच मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
कानपूरमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघाचे चाहते आपापसात भिडले. या झटापटीत बांगलादेशचा सुपरफॅन टायगर रॉबी जखमी झाला आहे. त्यानतंर तातडीने टायबर रॉबीला रुग्णालयात दाखल केले आहे. कसोटी सामन्याच्या लंच ब्रेकदरम्यान ही घटना घडली आहे.
रॉबीने सांगितले की, ‘काही लोकांनी माझ्या पाठ आणि पोटावर मारहाण केली. मला श्वास घ्यायलाही जड जात आहे. रॉबीने मारहाण केल्याचा दावा केल्यानंतर घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी हल्ला केल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. रॉबीने मारहाण केल्याचा दावा केल्यानंतर पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. रॉबीला मारहाण केल्यानंतर त्याला धड बोलायलाही जमेना. त्याला काही जणांनी उचलून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे दिसत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा