श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील बनपिंप्री येथील न्यू प्रशांत हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी घुसखोर महिलांना नाशिक येथील दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याविरोधात पारपत्र नियम कलमासह परकीय नागरिक कायद्यानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरसनिला अख्तर सफिउर सिकदर (वय २०, मूळ रा. पकोरीया, खासीयल, नुरेल, उपजिल्हा खलिया, बांग्लादेश, बदलेले नाव जुई जियारेल मंडल), रोमाना अख्तर रुमी (वय २०, मुळ रा. रा. हिदीया, वॉर्ड नंबर ६, अभय नगर, जैसोर, खुलना, बांग्लादेश, बदलेले नाव मिता आकाश शिंदे), सानिया रॉबीउल इस्लाम खान (वय २०, मुळ रा. बांग्लादेश, (पूर्ण पत्ता सांगता येत नाही) बदलेले नाव मिम मंडल), सानिफा अबेद अली खान (वय २०, मुळ रा. बांग्लादेश, (पूर्ण पत्ता सांगता येत नाही) बदलेले नाव -सानिफा जाहिद मंडल) अशी न्यू प्रशांत हॉटेल (अहिल्यानगर सोलापुर रोड, ता. श्रीगोंदा) येथून अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोर महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडे व्हिसा, पासपोर्ट नाही. चारही महिलांनी बांगलादेशमधून भारतात अवैधरित्या प्रवेश केला आहे. बेरोजगारीला कंटाळून भारतात आलो असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील न्यू प्रशांत हॉटेलमध्ये चार बांगलादेशी घुसखोर महिला कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकास मिळाली होती. त्यानूसार पथकाचे सहायक पोलीस निरिक्षक दत्तात्रय नलावडे, पोलिस उपनिरिक्षक सुखदेव मुरकुटे, सहायक फौजदार राकेश खेडकर, हवालदार अनिल गोरे व श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सहायक सहायक निरिक्षक गणेश अहिरे, सहायक फौजदार भगवान गांगर्डे, प्रमिला उबाळे, योगेश भापकर, होमगार्ड विशाल गोरखे, महिला होमगार्ड दिपाली मोटे यांनी पंचासह यू प्रशांत हॉटेलवर छापा टाकला व चार बांगलादेशी घुसखोर महिलांना अटक केली.
या महिला न्यू प्रशांत हॉटेल येथे काम करुन तेथेच राहत होत्या. त्यांच्याकडे रेडमी, ओपो मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, युनियन बँकेचे डेबीट कार्ड, एनएक्सजी, आयफोन, हवाई कंपनीचा मोबाईल असे साहित्य आढळले आहे. आयएमओ अॅपद्वारे बांग्लादेशातील नातेवाईकांशी त्या संपर्क साधत होत्या. त्यांच्या मोबाईलमधील कॉन्टेक्ट लिस्टमध्ये बांग्लादेश येथील कंन्ट्री कोड + ८८० असा क्रमांक असलेले नंबर आहेत. अधिक तपास सुरू आहे.