अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने कर्मचार्यांना हाताशी धरून एका व्यावसायिकाची 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. माळीवाडा परिसरातील बारातोटी कारंजा शाखेत सन 2013 ते 2019 या काळात ही घटना घडली. संजय सुदाम रोकडे (वय 48, रा. कोहीनूर मंगल कार्यालयासमोर, गुलमोहर रोड) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन शाखा व्यवस्थापक प्रकाश दत्तात्रय सावंत (रा. सेंट्रल बँक कॉलनी, सूतगिरणी रोड, श्रीरामपूर) व सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन इतर कर्मचारी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. सावंत यांनी तत्कालीन इतर बँकेच्या कर्मचार्यांना हाताशी धरून रोकडे यांच्या ओव्हर ड्राप्ट खात्यातून वेळोवेळी त्यांच्या सहीचे व सही नसलेले चेक वापरून खाते थकबाकीत असतानाही स्वत:च्या फायद्यासाठी चेक पास केले. वेळोवेळी ओडी खात्यात वाढ करून फिर्यादीचे कर्ज चालू असतानाही शाखा व्यवस्थापक सावंत याने फिर्यादीला ना हरकत प्रमाणपत्र खोटे बनवून दिले.
फिर्यादीचा विश्वास संपादन करून बनावट दस्तावेज तयार करून देत फिर्यादीची सुमारे 36 लाख रुपयांची फसवणूक केली. तू जर या माझ्या गैरव्यवहाराची कोठेही वाच्यता केली, तर मी तुझ्याविरुध्द अॅट्रासिटीची तक्रार करेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रोकडे यांनी याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली होती. चौकशीनंतर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.