Friday, November 22, 2024
Homeनगरबारामती अ‍ॅग्रोच्या विरोधातील उपोषणाला वाढता पाठींबा

बारामती अ‍ॅग्रोच्या विरोधातील उपोषणाला वाढता पाठींबा

दुसर्‍या दिवशीही उपोषण सुरूच || शेत जमिनीत फसवणूक केल्याचा आरोप

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

बारामती अ‍ॅग्रो कंपनीने शेत जमिनीचे पैसे दिले नाही म्हणून कुंडलिक जायभाय व कृष्णा जायभाय यांनी येथील तहसील कार्यालयाबाहेर सुरू केलेले उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरूच होते. दरम्यान, अनेकांनी दुसर्‍या दिवशी जायभाय यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. या उपोषणाला पाठिंबा वाढत आहे. मात्र प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. बारामती अ‍ॅग्रो कंपनीने शेत जमिनीचे पैसे न देता आमची फसवणूक केली असल्याचा आरोप जायभाय यांनी केला आहे.

- Advertisement -

पैसे दिले नसल्याने आमची शेत जमीन आम्हाला परत मिळावी या मागणीसाठी कर्जत तहसील कार्यालयाबाहेर 1 ऑक्टोबरपासून जायभाय यांनी उपोषण सुरू केले आहे. बुधवारी दुसर्‍या दिवशीही हे उपोषण सुरू होते. तहसीलदार गुरू बिराजदार यांनी 1 ऑक्टोबर रोजी जायभाय यांची भेट घेतली व आपल्या मागण्या संबंधित विभागाकडे पाठवून लवकरात लवकर पूर्ण करू असे सांगितले. मात्र आंदोलकांनी आमच्या मागण्या आहेत त्यावर प्रथम निर्णय घ्यावा, आम्हाला आमची जमीन परत द्यावी अशी मागणी तहसीलदार यांच्याशी चर्चा करताना केली व जोपर्यंत आमची जमीन आम्हाला परत दिली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही अशी भूमिका जायभाय यांनी घेतली.

दुसर्‍या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने शासकीय कार्यालयास सुट्टी होती. त्यामुळे आंदोलकांकडे दिवसभरामध्ये कोणीही फिरकले नाही. दरम्यान, कर्जतमध्ये बुधवारी जवळपास दीड तास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामध्ये देखील जायभाय यांचे उपोषण चालूच होते. सकाळी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

फसवणूक केलेली नाही : गुळवे
बारामती अ‍ॅग्रो कंपनीने शेत जमिनीच्या खरेदी- विक्रीमध्ये कोणाचीही फसवणूक केलेली नाही, असा खुलासा बारामती अ‍ॅग्रो कंपनीचे उप व्यवस्थापक सुभाष गुळवे व अ‍ॅड. प्रसाद खारतोडे यांनी पत्रकार परीषदेत केला. कंपनीने फसवणूक केलेलक्ष नाही. कंपनीचे खरेदी विक्रीचे अधिकार हे सर्वस्वी मला आहेत, असे गुळवे यांनी सांगितले. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे आ. पवार यांची बदनामी करण्यासाठी व जास्त पैसे मिळण्यासाठी जायभाय अशा पध्दतीचे उपोषण करून आंदोलन करत आहेत. त्यांच्या उपोषणाला व आंदोलनाला पाठिंबा देणारे सर्व आ. पवार यांचे विरोधक असल्याचा आरोप देखील गुळवे यांनी केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या