मुंबई । Mumbai
महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेसाठी विविध विभागांच्या निधीतून रक्कम वळवण्यात आल्याने मंत्र्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती.
शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत सरकारवर नाराजी दर्शवत म्हटले होते, “जर गरज नसेल तर हे खातेच बंद करा. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे.” त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “संजय शिरसाट काय बोलले, हे समजून घ्यावं लागेल. लाडकी बहीण योजना आदिवासी भागात आणि सामाजिक न्याय विभागातील काही घटकांमध्ये राबवली जात आहे. त्यामुळे थोडाफार निधी आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग यांच्याकडून घेतला गेला असेल, तर त्यात चुकीचं काही नाही.” बावनकुळे पुढे म्हणाले, “जेव्हा एखादी योजना राबवायची असते, तेव्हा ती राज्य सरकारच्या निर्णयाने राबवली जाते. विभाग वेगळे असले तरी निर्णय सामूहिक असतो. मी स्वतः संजय शिरसाट यांच्याशी चर्चा करणार आहे.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार मुख्यमंत्री होतील का, या प्रश्नावर संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की, “विकसित महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहणार. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आपापला पक्ष वाढवावा, यावर कुणालाही आक्षेप नाही. मात्र सरकार म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहोत.” ते पुढे म्हणाले, “महायुती सरकार खूप मजबूत आहे. कोणतीही नाराजी नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना असते की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. भाजपला फडणवीस, शिवसेनेला शिंदे, आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवार मुख्यमंत्री हवेत. पण याचा अर्थ बेबनाव नाही.”