नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता निर्माण झाली असून तेथील अल्पसंख्याकांवर आणि विशेषतः हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. याचे पडसाद भारतात देखील उमटता पाहायला मिळत आहेत. या दरम्यान आयपीएलमध्ये बांगलादेशच्या खेळाडूंना खेळवण्यावरुन वाद पेटला आहे. असे असतानाच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया यांनी आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सला बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला संघातून मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच्या बदल्यात दुसरा खेळाडू घेण्याची परवानगी बोर्डाने दिली आहे.
BCCI चे सचिव देवजित सैकिया यांनी याबाबत अधिकृत माहिती देताना सांगितले की, “सध्याची परिस्थिती लक्षात घेता KKR संघाने मुस्तफिजुर रहमानला रिलीज करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. संघाला हवे असल्यास पर्यायी खेळाडू घेण्याची मुभा दिली जाईल.” मुस्तफिजुरला केकेआरने खरेदी केल्यापासून फ्रँचायझीचे मालक शाहरुख खान यांच्यावर तीव्र टीका होत होती. अखेर हा वाद वाढल्यानंतर बीसीसीआयने अधिकृत हस्तक्षेप केला आहे.
१६ डिसेंबर रोजी झालेल्या आयपीएल २०२६ च्या लिलावात केकेआर संघाने मुस्तफिजुर रहमान याला विकत घेतले आहे. या लिलावात सात बांगलादेशी खेळाडूंनी भाग घेतला होता, मात्र फक्त मुस्तफिजुर याच्यावरच बोली लागली. त्याची बेस प्राइस ही २ कोटी रुपये होती, मात्र त्याला या लिलावात अखेरची बोली ९.२० कोटींची लागली. त्याला केकेआरने विकात घेतले. मुस्तफिजुरसाठी केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली होती. अखेर केकेआरने मोठी रक्कम मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतले. मात्र खरेदीनंतर लगेचच केकेआर आणि शाहरुख खान टीकेच्या केंद्रस्थानी आले.
मुस्तफिजुर रहमान २०१६ पासून आयपीएल खेळत आहे. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स अशा अनेक संघांकडून तो खेळला आहे. आतापर्यंत ६० आयपीएल सामन्यांत त्याने ६५ विकेट्स घेतल्या आहेत.
नेमका वाद काय?
मुस्तफिजुर रहमानला केकेआर संघात घेतल्यापासून सतत वाद सुरू आहे. बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे भारतात चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडूंना संधी देण्यावर भाजप आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणामुळे शाहरुख खान आणि केकेआर संघावर सातत्याने टीका होत आहे. “जो कोणी शाहरुख खानची जीभ छाटेल, त्याला आम्ही ₹1,00,000 चे रोख बक्षीस देऊ….”, असे अखिल भारतीय हिंदू महासभा आग्रा जिल्हा अध्यक्षा मीरा राठोड यांनी म्हटले होते.




