धुळे । dhule । प्रतिनिधी
घरगुती गॅस चा (Domestic gas) वापर घरातील स्वयंपाकासाठीच वापरणे योग्य आहे. किंबहूना तो त्यासाठीच तयार करण्यात आलेला आहे. असे असतांना त्याचा वापर अन्य कामांसाठी करत असाल तर सावधान…
शिरपूर शहरातील अंबिका नगरात घरगुती गॅसचा बेकायदेशिर वापर करणार्या दोघांवर कारवाई करण्यात आली. दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पिकअप वाहनासह 3 लाख 17 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत शिरपूर तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षक प्राजे सोमलकर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि.12 जानेवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील आर.सी.पटेल शाळेच्या मुख्य इमारतीच्या मागील एकता नगरात अनधिकृतरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधील गॅस इलेक्ट्रीक मोटार पंपाच्या सहाय्याने महेश दशरथ मराठे (वय 30 रा.अंबिका नगर) याच्या एम.एच.18/बी. जी.9603 क्रमांकाच्या पिकअप वाहनात योगेश भिका धनगर (वय 22 रा.शिरपूर) हा इले.मोटार व पंपाच्या सहाय्याने घरगुती गॅस भरताना आढळून आला.
या कारवाईत 3 लाखांचे पिकअप वाहन व 17 हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आगरकर करीत आहेत.