अहमदनगर|Ahmedagar
रात्रीच्या वेळी प्रवास करणार्या वाहन चालकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पिकअप चालक हौशीराम सुर्यभान बर्डे (वय- 35 रा. आडगाव ता. पाथर्डी) यांना तिघा परप्रांतीय
भामट्यांनी मारहाण करीत लुटले असल्याची घटना नगर- औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई (ता. नगर) शिवारात घडली. या लुटीत 4 हजार 300 रूपयाची रक्कम व एक मोबाईल असा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी तिघांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद रियाज मनेसुरी, मोहम्मद नसरूद्दीन मन्सुरी (दोघे रा. इसाहकपुर टेक आरवल, बिहार), आरीफ हसन शेख (रा. मिठणपुर ता. मुजफरपुर आरवल, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी बर्डे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हौशीराम बर्डे रविवारी रात्री नगर- औरंगाबाद रोडने त्यांचे पिकअप (क्र. एमएच- 16 वाय- 4068) घेऊन चालले होते. ते जेऊर शिवारातील एचपी पेट्रोलपंपाजवळ बाथरूमसाठी थांबले. यावेळी रात्रीचे साडेअकरा वाजले होते. त्यांच्याजवळ चोरटे आले. त्यातील दोघांनी बर्डे यांची गचंडी धरून लायसन्स व आधार कार्ड काढून घेतले. एकाने बर्डे यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातील 4 हजार 300 रूपये व मोबाईल काढून घेत पोबारा केला. घटनेची माहिती बर्डे यांनी तत्काल स्थानिकांना दिली. काही वेळातच एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाली. एमआयडीसी पोलिसांच्या गस्ती पथकाने रात्रीच घटनास्थळी धाव घेत आरोपींना जेऊर परिसरातून अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहे.