संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरातील दिल्लीनाका परिसरातील लकी पानटपरीजवळ तिघांना पान घेण्याच्या कारणातून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.4) साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत एकासह अनोळखी पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विकास दीपक गायकवाड (वय 26, रा.निळवंडे) हा त्याच्या मित्रांसोबत पान खाण्यासाठी लकी पान स्टॉल येथे थांबले होते. दुकानात जावून विकास याने साधे पान देण्यास सांगितले. परंतु, त्याने ऐकले नाही, म्हणून विकासने पुन्हा त्यास एक साधे पान द्या, असे सांगितले असता विक्रेत्यास राग आला. त्यानंतर विक्रेता जोरदार आवाज चढवून बाहेर आला.
याचवेळी हमरीतुमरी होवून विकासच्या डोक्याला तलवारीची मूठ लागली. त्यामुळे विकास खाली पडला. याचवेळी इतर पंधरा ते वीस अनोळखी इसम गोळा झाले. त्यांनी विकाससह त्याचा मित्र निखील बिडवे आणि विकास आहेर अशा तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी दुकानदाराने मोठमोठ्याने आवाज देत पुन्हा मारहाण केली. याच गडबडीत विकासच्या बोटातील सोन्याची अंगठी व खिशातील रोख रक्कम आठ हजार रुपये काढून घेऊन गेले. तसेच त्याचा मित्र निखीलला मारहाण करुन त्याच्या हातातीलही सोन्याची अंगठी व नऊ हजार रुपये रोख रक्कम खिशातून काढून घेतली. सदर मारहाणीत विकासच्या डोक्याला, हाताला, छातीला व पाठीला दुखापत झाली आहे.
निखीलच्या डोक्याला, हाताला, पायाला व पाठीला दुखापत झाली आहे. तसेच विकास आहेर याच्या हाताला, पायाला व पाठीला मुका मार लागला आहे. याप्रकरणी विकास गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीवरून लकी पान स्टॉल दुकानातील इसम व इतर पंधरा ते वीस अनोखळी व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता कलमांनुसार गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.